भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचे संबंध मागील अनेक वर्षांपासून चांगले असून येत्या काळात हे संबंध आणखी चांगले व्हावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नेपाळच्या उपपंतप्रधान सुजाता कोईराला यांनी दिली. ठाणे येथील सेंट्रल मैदानामध्ये ‘द लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठान’तर्फे आयोजित गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.
मुंबईपेक्षा उत्तरप्रदेश तसेच बिहार राज्यांमध्ये अनेक वेळा ये-जा सुरू असते. त्यामुळे भारतामध्ये परदेशात आल्यासारखे वाटत नाही, आपल्या देशातच असल्यासारखे वाटते, असेही कोईराला यांनी या वेळी सांगितले. तसेच नेपाळचे भारताबरोबरचे संबंध हे अतिशय जुने आहेत. त्यामुळे येत्या काळात भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमधील सहकार्याचे धोरण निश्चितच चांगले राहील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
नेपाळ आधी हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जायचे, पण आता त्याची ही ओळख पुसली गेली आहे. त्यामुळे ही ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी आम्ही सहकार्य करू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि नामदेव ढसाळ यांनीही उपस्थितांशी या वेळी संवाद साधला.
या कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या सिंधुताई बोलके यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उद्योजिका कल्पना सरोज, उद्योजक प्रशांत सकपाळ, प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव आणि संगीतकार चिनार महेश यांनाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही या वेळी आयोजन करण्यात आले होते. रिपाइंचे नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच या कार्यक्रमास नेपाळच्या वनमंत्री चंदा चौधरी उपस्थित होत्या.
भारताबरोबरचे संबंध आणखी चांगले करणार -सुजाता कोईराला
भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचे संबंध मागील अनेक वर्षांपासून चांगले असून येत्या काळात हे संबंध आणखी चांगले व्हावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नेपाळच्या उपपंतप्रधान सुजाता कोईराला यांनी दिली.
First published on: 16-05-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will keep more better relations with india sujata koirala