महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या दिवशी, म्हणजेच १ मे रोजी मुंबईतील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेचे रेल्वे सुरक्षा आयुक्त पी. एस. बघेल सध्या मेट्रो मार्ग, गाडय़ा आणि फलाटांची कसून तपासणी करत असून, सोमवारी या तपासणीचा अंतिम दिवस होता. त्यानंतर सुरक्षा आयुक्त आपला अहवाल सादर करून सुरक्षा प्रमाणपत्र देणार आहेत. मात्र मेट्रोचा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत येण्याचा मुहूर्त १६ मे नंतरचाच आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याने गेल्या पाच वर्षांत १२ वेळा डेडलाइन चुकवली आहे. दीड ते दोन तासांचा प्रवास २० मिनिटांच्या आवाक्यात आणणाऱ्या या प्रकल्पाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे. काही महिन्यांपासून चाचणीसाठी मेट्रो या मार्गावरून धावायला लागल्यानंतर मुंबईकरांना या मेट्रोची चाहूल लागली होती. मात्र अद्याप मेट्रो सुरू होण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. दरम्यान रिसर्च, डेव्हलपमेण्ट अ‍ॅण्ड स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन या संस्थेने मेट्रोची पाहणी करण्यास सुरुवात केली.
या संस्थेने आपला अहवाल ‘एमएमआरडीए’ला दिल्यानंतर ‘एमएमआरडीए’ने तो रेल्वे सुरक्षा आयुक्त पी. एस. बघेल यांच्याकडे पाठवला. या अहवालानंतर १८ एप्रिलपासून बघेल यांनी स्वत: मेट्रो मार्ग, मेट्रोचे डबे, विद्युत यंत्रणा, स्थानके यांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. ही चाचणी २८ एप्रिलपर्यंत चालेल, असे सांगण्यात येत होते. त्यानुसार सोमवारी या चाचणीचा अंतिम दिवस होता. ही चाचणी झाल्यानंतर १ मे रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्त सुरक्षा प्रमाणपत्र देतील. हे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे.
सुरक्षा प्रमाणपत्र १ मे रोजी मिळाले, तरीही सध्या देशभर असलेली आचारसंहिता विचारात घेता १६ मेनंतरच या मोठय़ा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकल्पाचे श्रेय घेऊन त्याचा लाभ आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये उचलण्याची संधी सत्ताधारी साधणार असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.
मेट्रोच्या डब्यांत तांत्रिक बिघाड?
दरम्यान, या चाचणीदरम्यान मेट्रोच्या डब्यांत तांत्रिक बिघाड असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त आपला अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करणार आहेत. त्यानंतर या बिघाडाबाबत रेल्वे बोर्ड निर्णय घेणार असल्याचे समजते. याबाबत रेल्वे बोर्डाचे सदस्य सुबोध जैन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या तरी अशा कोणत्याही बिघाडाची माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. तर बघेल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा