* काँग्रेसचे घोटाळे बाहेर काढणार-गडकरी
* नागपुरात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
भारतीय जनता पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता माझ्यासमोर कोणतीही मर्यादा शिल्लक नाही. मी मर्द असून यापुढे दिल्लीतील मैदानात राहूनच काँग्रेस नेत्यांचे सर्व घोटाळे बाहेर काढणार आहे, असा इशारा भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिला.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा नितीन गडकरी यांनी राजीनामा दिल्यानंतर ते अधिक आक्रमक झाले असून त्याचा प्रत्यय आज नागपुरात आला. जंगी स्वागताचा स्वीकार करून त्यांनी आयकर विभाग आणि इंग्रजी प्रसार माध्यमांवर जोरदार हल्ला चढविला. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर गेल्या अडीच वर्षांत विविध राज्यात भाजपचे वर्चस्व वाढत असताना काँग्रेसचे धाबे दणाणले. त्यामुळे काँग्रेसने इंग्रजी मिडियाला हाताशी धरून पूर्ती उद्योग समूहावरून माझ्यावर आरोप सुरू केले. राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने माझ्यावर काही मर्यादा होत्या मात्र, राजीनामा दिल्याने माझ्यावर आता कुठलेही बंधन नाही. मी मर्द आहे, त्यामुळे आता शांत बसणार नाही. मैदानात उतरून काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणणार आहे. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यास उत्तर द्यावे, असा इशारा गडकरी यांनी दिला.
काँग्रेसच्या नेत्यांच्या आरोपामुळे मी घाबरणार नसून त्यांच्या आरोपांना उत्तर देईल. आजपर्यंत पक्षाने दिलेल्या प्रत्येक पदावर प्रामाणिक आणि निष्ठेने काम केले आहे त्यामुळे माझ्यावरील झालेले आरोप कदापि सहन करणार नाही. राज्यात सार्वजानिक बांधकाम मंत्री असताना राज्याचा विकास केला. १३०० कोटी रुपये खर्च करून एक्सप्रेस हायवे बांधला आहे. सरकारचा अनेक ठिकाणी पैसा वाचवून विकास कामे केली. काँग्रेसच्या नेत्यांनी पैसा वाचविणे तर सोडाच आपले गल्ले कसे भरता येईल, याचा विचार केला आणि राज्याचा बट्टयाबोळ केला आहे असा आरोप गडकरी यांनी केला.
माझ्यावरील आरोपामुळे पक्षाची अडचण वाढली होती त्यामुळे पक्षाचा आदर राखत राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून चौकशीसाठी मी तयार आहे. जोपर्यंत आरोपातून निर्दोष होत नाही तोपर्यंत मी कुठलेही पद स्वीकारणार नाही. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून यापुढे काम करणार आहे.
कुठल्याही पदासाठी कधीही राजकारण केले नाही. कधी  पद मागितले नाही. त्यामुळे अध्यक्षपद गेल्याने मी मुळीच दुखी नाही आणि कार्यकत्यानीही दुखी होऊ नये असे आवाहन गडकरी यांनी केले.
यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी  गडकरी यांनीच नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी केली.  मात्र निवडणूक तुम्हालाच लढवायची असे सांगून नागपुरातून लोकसभेचा आखाडा लढण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी यावेळी दिले. लोकसभा निवडणुकीसाठी कर्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
विमानतळावर जल्लोषात स्वागत
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीन गडकरी यांचे गुरुवारी सकाळी नागपुरात आगमन झाल्यावर हजारो कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत केले. ‘नितीन गडकरी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले.
राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीन गडकरी आज सकाळी नागपुरात परत येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाने आव्हान केल्याप्रमाणे हजारो युवा कार्यकर्ते आणि गडकरी यांच्यावर प्रेम करणारे नागरिक विमानतळ परिसरात जमा झाले होते. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी गडकरी येताच कार्यकर्त्यांनी त्यांचे घोषणा देत जोशात स्वागत केले. शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे, प्रदेश सरचिटणीस देवेंद्र फडणवीस आणि महापौर अनिल सोले यांनी नितीन गडकरी यांचे स्वागत केले.
विमानतळावरून थेट निवासस्थानी आल्यावर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बंटी कुकडे आणि त्यांच्या कार्यकत्यार्ंनी गडकरी यांनी स्वागत केले. ज्या जल्लोशात गडकरी यांचे निवासस्थान परिसरात स्वागत केले जाते तो जल्लोश आज टाळण्यात आला. विमानतळावर आलेल्या कार्यकत्यार्ंना निवासस्थानी न येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे फक्त पदाधिकारीच वाडय़ावर आले. यावेळी गडकरी यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत काही वेळ चर्चा केली. यावेळी आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, डॉ. रवींद्र भोयर, दयाशंकर तिवारी, उपमहापौर संदीप जाधव, प्रवीण दटके, राजेश बागडी, प्रमोद पेंडके, संदीप जोशी, कल्पना पांडे आदी शहराचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Story img Loader