वसरेवा-अंधेरी-घाटकोपर ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मेट्रो रेल्वे नेमकी कधी सुरू होणार याचा अधिकृत मुहूर्त अद्याप जाहीर झालेला नाही. मेट्रोच्या चाचण्या सुरू झाल्या असताना आता मेट्रोची स्थानकेही अत्याधुनिक सुविधांसह सज्ज झाली आहे. प्रतीक्षा आहे ती प्रवाशांना घेण्यासाठी मेट्रो कधी येते याची. या स्थानकांचे वैशिष्टय़ म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत अवघ्या चार मिनिटांत संपूर्ण स्थानक रिकामे होईल अशी त्याची रचना आहे. वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. या मेट्रो मार्गावर वसरेवा, डी. एन. नगर, आझाद नगर, अंधेरी, पश्चिम द्रुतगती मार्ग, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकीनाका, सुभाष नगर, असल्फा रोड आणि घाटकोपर अशी १२ स्थानके आहेत. या मेट्रोमुळे घाटकोपर ते वसरेवा हे अंतर अवघ्या २१ मिनिटांत कापता येणार आहे. एरवी हे अंतर कापण्यासाठी सुमारे पाऊण तास लागतो. तर वाहतूक कोंडीमुळे बऱ्याचदा तब्बल दीड तास खर्ची पडतो.
‘वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर’ हा बहुचर्चित ‘मेट्रोवन’ प्रकल्प सुरू होण्याची आस मुंबईकरांना लागली आहे. मेट्रोचा हा मार्ग पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा असून घाटकोपर आणि अंधेरी ही दोन महत्त्वाची व अतिशय गर्दीची स्थानके जोडणारा आहे. पश्चिम तसेच मध्य रेल्वे प्रशासनाने मेट्रोमुळे वाढणाऱ्या प्रवाशांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरू केली असली, तरी या दोन स्थानकांवर वाढणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी जादा गाडय़ा वा १५ डबा गाडय़ांच्या वाढीव फेऱ्यांबाबत अद्याप कसलेही नियोजन झालेले नाही. परिणामी भविष्यकाळात मेट्रोमुळे वाढणाऱ्या रेल्वे प्रवाशांना भयानक गर्दीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. विशेषत: घाटकोपर स्थानकावर गर्दीचा मोठा ताण पडण्याची शक्यता आहे.
आव्हान काय?
*  मेट्रोमार्ग सुरू झाल्यानंतर सध्या अंधेरीवरून मुलुंडला जाण्यासाठी बेस्ट बसचा पर्याय निवडणारे अनेक प्रवासी वाहतूक कोंडीत फसण्यापेक्षा मेट्रोने घाटकोपर स्थानक गाठून मुलुंडला जाणे पसंत करतील. हीच गोष्ट मुलुंड-अंधेरी किंवा ठाणे-अंधेरी प्रवास करणाऱ्यांबाबत होईल. सध्या मुलुंड किंवा ठाणे येथून अंधेरीला जाण्यासाठी अनेक जण प्रवासी बेस्टचा पर्याय निवडतात. पवई-साकीनाकामार्गे जाणारी ही बस वाहतूक कोंडीत अडकत असली, तरी रेल्वेची गर्दी टाळण्यासाठी हा पर्याय निवडला जातो.
* साकीनाक्याला जाणारे अनेक जण कुल्र्याहून बसने जातात. जरीमरी-बैलबाजार अशा चिंचोळ्या रस्त्यावरून होणारा हा प्रवास अतिशय त्रासदायक आहे. सध्या या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. त्यामुळे कुल्र्याला उतरणारे अनेक जण घाटकोपरलाच उतरून मेट्रोने १२-१५ मिनिटांत साकीनाका गाठतील.
* पूर्व उपनगरांतून गोरेगाव किंवा मालाड येथे कामाला जाणारे लोक सध्या मध्य रेल्वेवर दादरला उतरून पश्चिम रेल्वेचा अवलंब करतात. पण मेट्रो सुरू झाल्यानंतर दादरऐवजी घाटकोपरला उतरून ते अंधेरी गाठतील आणि पुढील प्रवास करतील. परतीचा प्रवासही तसाच करतील. त्यामुळे अंधेरी आणि घाटकोपर या स्थानकांवरील प्रवाशांचा ताण वाढणार आहे.
* सध्या या दोन्ही स्थानकांमधून जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दी ओसंडून वाहत असते. आगामी काळात मेट्रोमुळे वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेता सध्याच्या लोकलफेऱ्या अपुऱ्या ठरणार आहेत. मेट्रोने अंधेरी किंवा घाटकोपरला पोहोचलेल्या प्रवाशांना रेल्वेत चढताना या स्थानकांवर भीषण गर्दीचा सामना करावा लागला, तर या स्थानकांवर अपघातही होऊ शकतात. त्याचप्रमाणे या प्रवाशांना झटपट तिकीट मिळावे, याचीही सोय दोन्ही रेल्वे प्रशासनाला पाहावी लागणार आहे. या दोन्ही स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचा विचार करून प्रसाधनगृहे, स्वच्छतागृहे, स्टॉल्स आदी सुविधांचीही सोय रेल्वेला करावी लागेल.

काय काय हवे?
* नजीकच्या काळात रेल्वेच्या अंधेरी आणि घाटकोपर स्थानकांतून मेट्रोच्या स्थानकात प्रवेश करण्यासाठी पुरेसे मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. घाटकोपर पश्चिम आणि अंधेरी पूर्व या दोन्ही बाजूला असलेल्या फलाटांची प्रवेशद्वारे रुंद करण्याची गरज आहे. तसेच मेट्रो पुलावरून धावणार असल्याने या मेट्रोची स्थानके अंधेरी आणि घाटकोपर येथील १२ मीटर रुंद पादचारी पुलाला जोडणे आवश्यक आहे.
* वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनांना तिकिटांची सोय करावी लागणार आहे. त्यासाठी मेट्रो स्थानकांवर तिकीट खिडक्या, जास्तीत जास्त एटीव्हीएम मशिन्स आदींची गरज आहे. दुबईसारख्या देशांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या ‘रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटी’च्या धर्तीवर मुंबईतही अशी प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. या प्रणालीनुसार मेट्रो, रेल्वे आणि बेस्ट यांच्यासाठी एकच स्मार्टकार्ड वापरता येईल.
* पश्चिम रेल्वेवर अंधेरीहून सुटणाऱ्या अनेक गाडय़ा आहेत. या गाडय़ा चर्चगेट व विरार या दोन्ही दिशांना जातात. मात्र मध्य रेल्वेवर घाटकोपरहून सुटणारी एकच गाडी, तीदेखील सकाळच्या वेळेत आहे. त्यामुळे घाटकोपरला मेट्रोने येऊन रेल्वेने मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी समस्या असणार आहे. यासाठी घाटकोपरहून सुटणाऱ्या गाडय़ांबाबत प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे शक्य नसल्यास कुल्र्याहून कल्याणच्या दिशेने आणि ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ांची संख्या वाढवणे आवश्यक आहे.

रेल्वेची तयारी किती?
* मध्य रेल्वेने घाटकोपर स्थानकात १२ मीटर रुंद पादचारी पूल बांधला आहे. हा पूल पश्चिमेला मेट्रोच्या स्थानकाशी जोडल्यामुळे या गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित करता येईल. मेट्रोच्या प्रवाशांना थेट घाटकोपर रेल्वे स्थानकात शिरता येणे यामुळे सहज शक्य होईल.
* पश्चिम रेल्वेनेही अंधेरी येथील १२ मीटर रुंद पादचारी पूल पूर्वेकडे मेट्रो स्थानकाशी जोडत प्रवाशांची सोय बघितली आहे. त्याशिवाय प्रवाशांना स्थानकात शिरणे सोयीचे व्हावे, यासाठी सुधारणा करण्यात येणार आहेत.
* मेट्रोच्या अंधेरी आणि घाटकोपर या दोन्ही स्थानकांवर रेल्वेची तिकीट खिडकी उघडण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वेने एमएमआरडीएकडे पाठवला आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी मेट्रो स्टेशनच्या बाहेर येण्याची गरज पडणार नाही.
* पश्चिम रेल्वेवर ४९० नवीन एटीव्हीएम मशिन्स लवकरच बसवण्यात येणार आहेत. त्यापैकी काही मशिन्स मेट्रो स्थानक परिसर आणि अंधेरी स्थानकात बसवली जाणार आहेत.

जादा फेऱ्यांचे काय?
* पश्चिम रेल्वेने अंधेरीवरून जादा गाडय़ा सोडण्याचा कोणताही विचार अद्याप तरी केलेला नाही. अंधेरी स्थानकातून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे हार्बर मार्गाने जाणाऱ्या गाडय़ा सुटतात. तसेच चर्चगेट व विरारकडे जाणाऱ्या गाडय़ाही येथून सुटतात. त्यामुळे जादा गाडय़ा सोडाव्या लागल्यास, आमची तयारी असेल, असे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी स्पष्ट केले.
* पश्चिम रेल्वेला अंधेरी स्थानकातून गाडय़ा सोडणे शक्य होणार आहे. मात्र मध्य रेल्वेवर घाटकोपर स्थानकातून गाडी सोडणे शक्य नाही. त्यामुळे तेथे प्रवाशांचा ताण जास्त असेल. घाटकोपर स्थानकातील चारही प्लॅटफॉर्म दिवसभर व्यग्र असतात. घाटकोपर लोकल  चालवणे शक्य नाही. मात्र वाढणाऱ्या गर्दीचा विचार करून रेल्वे अर्थसंकल्पात फेऱ्यांची संख्या वाढवल्यास कुर्ला स्थानकातून कल्याणच्या दिशेने आणि ठाणे स्थानकातून मुंबईच्या दिशेने काही गाडय़ा सोडता येतील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले.
* मध्य रेल्वेवर सध्या १५ डब्यांची एकच गाडी धावते. त्यामुळे घाटकोपरला वाढणारी गर्दी वाहून आणण्यासाठी या एकाच गाडीच्या फेऱ्या पुरेशा नाहीत. त्यामुळे १५ डब्यांच्या गाडय़ांचा ताफा वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. मेट्रोचा विचार करून मध्य रेल्वेने तशी तयारी केल्याचे दिसत नाही.

मेट्रो स्थानकांवरील सुविधा
*  एकूण १०० हून अधिक एलसीडी टीव्ही
*  प्रत्येक स्थानकावर लिफ्ट, एस्कलेटरची सोय.
* अत्याधुनिक तिकीट खिडकी,
   तिकीट व्हेंडिंग मशीन (टीव्हीएम)
* संपूण मेट्रोमार्गावर ७०० सीसीटीव्ही    कॅमेऱ्यांद्वारे २४ तास नजर, सामानाच्या
    तपासणीसाठी स्कॅनर.
* मराठी, हिंदी, इंग्रजीतून मार्गदर्शक फलक.
* अग्निप्रतिबंधक धातूचे दरवाजे.
* मंदिराच्या छतासारखी स्थानकांच्या छताची रचना

मेट्रोची स्थानके सज्ज
वर्सोवा
डी.एन.नगर
आझाद नगर
अंधेरी
पश्चिम द्रुतगती मार्ग
चकाला
विमानतळ मार्ग
साकीनाका
असल्फा
जागृतीनगर
घाटकोपर

Story img Loader