केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेने यंदा विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पांसाठी ‘हवा आणि हवामान’ हा विषय दिला आहे. दरवर्षी जिल्हा, विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर बालविज्ञान परिषदा आयोजित केल्या जातात. यंदा राष्ट्रीय स्तरावरील परिषद २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान बंगळुरू येथे होणार आहे.
११ ते १७ वयोगटातील मुलांमध्ये मूलभूत विज्ञान संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने आयोजित या परिषदेत महाराष्ट्रातून विविध शाळांमधून प्रकल्प सादर केले जातात.
विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालची हवा, मानवी कृतींचा हवामानावर होणारा परिणाम, हवामान आणि परिसंस्था, हवामान-समाज आणि संस्कृती, शेती आणि हवामान तसेच हवामान आणि आरोग्य या संदर्भात संशोधन प्रकल्प सादर करणे अपेक्षित आहे. क्रमिक अभ्यासक्रमापलीकडे जात वैज्ञानिक संज्ञांचा वापर करून दैनंदिन जीवनाशी निगडित पैलूंचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा हा परिषदेचा हेतू आहे. संबंधित विषयाबाबतचे सर्वेक्षण, निरीक्षण, नोंदी, पडताळणी आणि अखेरीस निष्कर्ष अशी मांडणी प्रकल्पात करणे आवश्यक असते. कमाल दोन हजार शब्दांचा हा प्रकल्प पोस्टर्सच्या माध्यमातून सादर करावा लागणार आहे. आपण ज्या परिसरात राहतो, त्या भागातील हवामानाचा अभ्यास करण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
जिल्हास्तरीय बालविज्ञान परिषद ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होईल. विभागीय परिषद नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात तर राज्यस्तरीय परिषद शेवटच्या आठवडय़ात होईल. राज्यस्तरीय परिषदेत सादर झालेल्या प्रकल्पांपैकी निवडक प्रकल्प राष्ट्रीय परिषदेसाठी पाठविले जातील. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परिषदेत भाग घ्यावा, असे आवाहन जिज्ञासा या राज्य समन्वयक संस्थेचे सुरेंद्र दिघे यांनी केले आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी संबंधितांनी http://www.jidnyasatrustthane या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि ३० ऑगस्टपूर्वी आपापल्या प्रकल्पांची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा