सरकारच्या वतीने सुरू केलेल्या मॉडेल कॉलेजमध्ये आरक्षण नियमांना हरताळ फासून शिक्षकांची भरती करण्यात आली. मागास उमेदवारांवर हा अन्याय असल्याची तक्रार रामदास सोनवणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.
सरकारने हिंगोली शहरात गेल्या वर्षी मॉडेल कॉलेज सुरू केले. यामध्ये बी. एस्सी., बीसीए, बी. कॉम. व बी. ए. असा अभ्यासक्रम सुरू झाला. गेल्या वर्षी सर्व शाखांसाठी ११, तर इंग्रजी व गणित या दोन विषयांसाठी स्वतंत्र २ प्राध्यापकांची भरती करण्यात आली.
यात ३ नियमित, तर तासिका तत्त्वावर १० जागा आहेत. भरलेल्या जागांपैकी केवळ एका जागेवर अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेला संधी देण्यात आली. बाकीच्या सर्व जागांवर बिगरआरक्षित प्रवर्गातील उमेदवारांचा भरणा करण्यात आल्याचा आरोप निवेदनात केला आहे. विद्याशाखानिहाय सूक्ष्म आरक्षण नियमही या भरतीप्रक्रियेत पाळले नसल्याचे म्हटले आहे. या भरतीप्रकरणी मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाला असल्याची तक्रार काही उमेदवारांनी केली होती. त्यावर तासिका तत्त्वावर तीनजणांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांना मिळणारे वेतन, मानधन व मजुरीचा विचार केल्यास त्यात तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी प्राचार्या बी. आर. झाटे यांनी चालू वर्षी आरक्षण नियमानुसारच पदे भरणार असल्याचे सांगितले. पदमान्यतेसाठी शिक्षण संचालकांना प्रस्ताव पाठवला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा