धुळे शहर पुन्हा अनिल गोटेंच्या पाठीशी
दरम्यानच्या काळात गोटे यांच्या राजकीय प्रभावाखाली आलेल्या धुळेकरांनी नगरपालिकाही गोटे यांच्याकडे सुपूर्द केली. गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडूनही आल्या. यामुळे गोटे यांचा राजकीय आत्मविश्वास बळावला होता. मोजके कार्यकर्ते आणि लोकसंग्राम पक्षाच्या विविध विभागाची पदे फार काळ न सांभाळता ती सोडणारे पदाधिकारी अशा स्वत:च्या राजकीय वलयात राहणाऱ्या गोटे यांना धुळेकरांचा भक्कम असा पाठिंबा राहिला. त्यांनी शहरात उभारलेले शहीद अब्दुल हमीद स्मारक, गुरू-शिष्य स्मारक, अग्रसेन पुतळा, भीमतीर्थ, पांझरा नदीकिनारी उभारलेली चौपाटी आणि पांझरेच्या अलिकडील काठावर बांधलेल्या भिंतीमुळे झालेले रुंदीकरण, विशिष्ट पथदिवे, वृक्ष लागवड अशा कामांमुळे गोटे यांचे राजकीय मूळ घट्ट झाले. पहिल्या टप्प्यात टंचाईच्या काळात गोटे यांनी नकाणे तलावापर्यंत आणलेला एक्स्प्रेस कालवा हा त्यांच्या राजकीय जीवनातील ‘माईलस्टोन’ ठरला. या कालव्यात पॉलिथिन अंथरून धरणातून आणलेले पाणी पुरेपूर क्षमतेने धुळ्यापर्यंत आणण्यात गोटे यांना यश आले. मुद्रांक घोटाळ्यात तुरूंगवास भोगल्यानंतरही ते धुळ्यात पोहोचताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनामुळे गोटे राज्यभर चर्चेत आले होते. बंद पडलेल्या पतसंस्थांमधील ठेवी परत मिळवून देण्यासाठी गोटे यांनी पाठपुरावा केला. यासाठी संघर्ष समिती सक्रिय केली. परिणामी महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी हेमा गोटे व सूनबाई देखील पराभूत झाल्या. आता भाजपचे उमेदवार म्हणून त्यांची नवीन राजकीय कारकिर्द सुरू झाली आहे.
धुळे ग्रामीणमध्ये कुणाल पाटील यांचा डंका
जवाहर सहकारी सूतगिरणीचे कुणाल पाटील हे अध्यक्ष आहेत. यापूर्वी कुणाल यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून आपले राजकीय भवितव्य आजमावले होते. परंतु त्यांना दोन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेला विजय रोहिदासदाजी यांचे वर्चस्व जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर पुन्हा निर्माण होण्यसााठी महत्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या काही महिन्यात कुणाल यांच्या सोबत गावागावात भेट देत रोहिदास पाटील यांनी लहान-मोठे कार्यक्रम घडवून आणले. जवाहर कृतज्ञता ट्रस्टच्या माध्यमातून कुणाल यांनी धुळे तालुक्यातील गावागावांमध्ये विविध लोकोपयोगी कामे करत जनसंपर्क वाढवला. दिवंगत माजी खासदार चुडामण पाटील यांचे नातू असलेल्या कुणाल यांच्याशी संबंधीत असलेल्या मतदारसंघातील अनेक शैक्षणिक संस्था, जवाहर वैद्यकीय महाविद्यालय, दंड चिकीत्सा महाविद्यालय, शिवाजी विद्या प्रसारक संस्था आदींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोठी फळी पाठीशी असलेल्या कुणाल पाटील यांनी यावेळी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे.
शिंदखेडय़ात रावलांचा ‘जय’
उद्योग, व्यापारी आणि लोकप्रतिनिधी अशा तिन्ही आघाडय़ांवर जयकुमार रावल यांना चांगलेच यश मिळाले आहे. उद्योगातून तालुक्यातील मतदारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात जयकुमार यशस्वी झाल्याने त्याचाही निवडणुकीत त्यांना लाभ झाला. तालुक्यातील दुष्काळी भागात सिंचनाच्या योजनांना चालना, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांच्यासह क्रीडा, औद्योगीकरण अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला. राजकारणातील युवा उच्चशिक्षित ही अजून एक त्यांची ओळख. सहकारी संस्था, स्टार्च फॅक्टरी, दूध संघ आणि शैक्षणिक संस्थांवर साम्राज्य. विविध दर्जेदार उत्पादने करणारा आणि देशात नाव लौकीक असलेल्या स्टार्च प्रकल्पामुळे रावल हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. भाजपच्या संघटनात्मक कार्यक्रमात उत्साहाने त्यांचा सहभाग राहात आला आहे. भाजपमधील उच्च पदाधिकाऱ्यांशी त्यांची जवळीक आहे. विधानसभेत आक्रमक राहून मतदारसंघातील प्रश्न पोटतिडकीने मांडत जनतेला न्याय मिळवून देणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. प्रसंगी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी भांडणारा आणि योजना आपल्या तालुक्याकडे वळविण्यात त्यांचा हातखंडा आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना त्यांना त्यांच्या शिक्षणाचा अधिक उपयोग होत आला आहे.
शिरपूरमध्ये पटेलांच्या शक्तिवर काशिराम पावरा स्वार
मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर २००९ मध्ये शिरपूर मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे पटेल यांना आपल्याऐवजी पावरा यांना संधी देणे भाग पडले. पावरा यांचे शिक्षण फारसे नसले तरी ती बाब त्यांच्यासाठी कधी नुकसानकारक ठरली नाही. कारण पटेल यांचे मार्गदर्शन. मतदारसंघातील आदिवासीवर्ग पावरा यांच्या पाठीशी उभा आहे. शिवाय पटेल यांच्यामुळे व्यापारीवर्ग आणि मध्यमवर्गीयांनीही पावरा यांना साथ दिली. २००९ ची विधानसभा निवडणूक जिंकण्याआधी पावरा हे राजकारणात अगदीच नवखे होते असे नव्हे. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केल्याचा अनुभव त्यांच्या कामाशी आला. अत्यंत साधी राहणी. आमदार असूनही सर्वसामान्यांमध्ये वावर. आदिवासींचे प्रश्न, समस्यांबाबत संवेदनशील सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी धडपड करणारा लोकप्रतिनिधी ही त्यांची बलस्थाने म्हणावी लागतील.
धुळे जिल्हयातील विजयी उमेदवार
धुळे शहर पुन्हा अनिल गोटेंच्या पाठीशीमागील निवडणुकीत लोकसंग्राम पक्षाकडून विजयी झालेले अनिल गोटे आता भाजपचे आमदार झाले आहेत. किसान ट्रस्टच्या माध्यमातून उभारलेले शहरातील शिवतीर्थ हे गोटे यांचे खरे राजकीय बस्तान बसवणारे ठरले. धुळेकरांनी या स्मारकाचे कौतुक करत गोटे यांना राजकीय …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-10-2014 at 01:05 IST
TOPICSनिवडणूक निकाल २०२४Election Resultsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024महारिझल्टMAHRESULT
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winning candidate of dhule district