गावितांची भाजपमध्ये ‘विजयी’ धडक
मतमोजणी प्रक्रीया सुरु झाल्यापासुनच डॉ विजयकुमार गावितांनी निर्णायक आघाडीकडे वाटचाल केली २४ व्या फेरी अखेरही त्यांची बढत कायम राहील्याने त्यांचा दणदणीत विजय झाला आहे. डॉ. विजयकुमार गावित यांना १.०१,३८ तर कुणाल वसावेंना ७४२१० मते मिळाली आहे. १९९५ पासुन डॉ. विजयकुमार गावित सातत्याने नंदुरबार मतदारसंघातुन निवडणुन जात आहे. पहिल्यांदा अपक्ष नंतर तीनदा राष्ट्रवादीत तर आता पाचव्यांदा भाजपाच्या माध्यमातुन त्यांनी विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे आदिवासी समाजातील सर्वात मोठे नेतृत्व मानल्या जाणाऱ्या डॉ. गावितांनी युती आणि आघाडी या दोन्ही शासनाच्या काळात सातत्याने २० वर्षांच्या कालावधीत आदिवासी विकास विभाग, पयर्टन, वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन, मंत्रीपदाची धुरा संभाळली आहे.
आपली कन्या हिनाच्या खासदारकीनंतर डॉ. विजयकुमार गावितांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यातच त्यांच्या समोर यंदा प्रथमच पंधरा वर्षांंनंतर काँग्रेस लढत होती त्यांमुळेच नंदुरबारातील लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. मात्र राजकारणात मुरब्बी समजल्या जाणाऱ्या डॉ. गावितांनी कॉग्रेसला धूळ चारत विजय संपादन केला आहे.
शहाद्यात उदेसिंग पाडवींच्या रूपात ‘कमळ’ फुलले
शिवसेना आणि भाजप यांच्याशी आपल्या राजकीय जीवनात जवळीक साधणारे उदेसिंग पाडवी यांना याआधी दोनवेळा विजयाने हुलकावणी दिली होती. परंतु अखेरीस यावेळी भाजपसाठी अनुकूल झालेल्या वातावरणाची साथ मिळाल्याने शहादा मतदारसंघातून ते विधानसभेत प्रवेश करणार आहेत.
पाडवी यांनी २००४ मध्ये अक्राणी मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २००९ मध्ये शहादा मतदारसंघातून त्यांनी नशिब आजमावून पाहिले. परंतु दोन्ही वेळेस विजय त्यांच्यापासून दूरच राहिला. या दोन्ही निवडणुकांमध्ये पाडवी यांनी क्रमांक दोनची मते मिळ्वली होती. राजकारणात पाडवी हे चांगलेच अनुभवी आहेत. १५ वर्षांपासून तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ते प्रतिनिधीत्व करत आहेत. शिवसेनेकडून निवडणूक लढवून यश मिळत नसल्याने आणि नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेला साजेशी परिस्थिती नसल्याने या पक्षाकडून भविष्यातही निवडून येण्याची शक्यता तशी कमीच. हे लक्षात आल्यानंतर पाडवी हे २०१२ मध्ये भाजपवासी झाले. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतु हीना गावित यांना पक्षाने उमेदवार देऊन पाडवी यांना शहादा मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे पक्षाने आपले आश्वासन पाळले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे पाडवी हे निकटवर्तीय मानले जातात.
अक्राणीत के. सी. पाडवींचे वर्चस्व अबाधित
आदिवासी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे आलेले काँग्रेसचे के. सी. पाडवी यांनी मोदी लाटेतही अक्राणी- अक्कलकुवा मतदारसंघातून विजय मिळवित काँग्रेसला दिलासा दिला.
१९९० च्या दशकात राजकारणात प्रवेश केलेल्या के. सी. पाडवी यांचा आक्रमकपणा त्यांना सामाजिक कार्याप्रमाणेच राजकारणातही चांगलाच उपयोगी पडला. जनमानसात त्यांची वेगळी प्रतिमा तयार होण्यास त्यामुळे मदत झाली. १९९० मध्ये जनता दलाकडून निवडणूक लढवित त्यांनी विजय संपादन केला होता. आपल्या कामामुळे आणि जनतेशी असलेल्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे १९९५ मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले. तेव्हांपासून आजतागायत ते अक्कलकुवा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असून १९९९ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून सर्वप्रथम निवडणूक लढवली. आदिवासी दुर्गम भागातील वाडय़ापाडय़ाच्या गावपुढाऱ्यांना हाताशी धरून राजकारण करण्यासाठी ते प्रसिध्द आहेत. मुंबईत सर्वाधिक काळ वास्तवास राहूनही सातत्याने निवडून येण्याची हातोटी त्यांना गवसली आहे. आतार्ययत सहावेळा निवडून येऊनही त्यांना मंत्रीपद काही मिळालेले नाही.
नवापूरमध्ये सुरूपसिंग नाईक यांचा ‘बदला’
काँग्रेसचे निष्ठावंत आणि गांधी घराण्याचे महाराष्ट्रातील अत्यंत निकटवर्तीय नेते म्हणून ज्या मोजक्या नेत्यांची नावे घेतली जातात, त्यात नवापूर मतदारसंघातील सुरूपसिंग हिऱ्या नाईक यांचा समावेश आहे. २००९ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढविणारे शरद गावित यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाचा बदला नाईक यांनी या निवडणुकीत घेतला. १९७४ मध्ये प्रथम सुरूपसिंग नाईक हे नवापूर मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही विजयश्री प्राप्त करत त्यांनी दिल्ली गाठली. इंदिरा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे १९८२ पासून ते पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. १९८५ पासून २००९ पर्यंत त्यांनी सातत्याने नवापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. १९८२ पासून राज्यात त्यांनी मंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. वने व बंदरे, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, आदिवासी विकास, समाजकल्याण, अशा अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.
नंदूरबार जिल्ह्य़ातील विजयी उमेदवार
नंदुरबारमधून भाजपाच्या डॉ.विजयकुमार गावितांचा २७११८ मतांनी विजय झाला असुन त्यांनी कॉग्रेसचे उमेदवार कुणाल वसांवेचा पराभव केला आहे.
आणखी वाचा
First published on: 20-10-2014 at 01:03 IST
TOPICSनिवडणूक निकाल २०२४Election Resultsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024महारिझल्टMAHRESULT
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winning candidate of nandurbar district