नोव्हेंबरच्या मध्यावर नीचांकी तापमानाला स्पर्श करून थंडीने मारलेल्या दडीचा कालावधी लांबला असून तापमान १२ ते १४ अंशाच्या दरम्यान रेंगाळत असल्याने हवेतील गारवाही बराचसा कमी झाला आहे. रात्री व भल्या पहाटेचा अपवाद वगळल्यास दिवसा उन्हाळा असल्यागत वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आणि आकाश निरभ्र झाले तर थंडीचे पुनरागमन होईल, असे चित्र आहे.
थंडीविना यंदाची दिवाळी गेल्यानंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या तापमानात झपाटय़ाने बदल झाले आणि तापमानाने हंगामातील नीचांकी म्हणजे आठ अंशांची पातळी गाठून यंदा हिवाळ्याचा बाज काही और राहणार असल्याचे अधोरेखीत केले होते. गेल्या वर्षांतील तुलनेत थंडीचे महिनाभर आधीच आगमन झाल्यामुळे नेहमीपेक्षा यंदाचा हिवाळ्याचा हंगाम वेगळा ठरणार असल्याचे वाटत होते. या वर्षी सर्वाधिक काळ गारव्याची अनुभूती मिळण्याची शक्यता दिसत असताना गारव्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. नोव्हेंबरच्या अखेरीस अंतर्धान पावलेली थंडी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात परतून आली नाही. या काळात आधीचे तापमान आणि सध्याच्या तापमानात सहा ते सात अंशांचा फरक राहिला. म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस असणारी तापमानाची पातळी शुक्रवापर्यंत कायम राहिल्याचे दिसत होते.
रात्रीच्यावेळी अनेक भागात दाटणारे ढग आणि थंडावलेला वारा ही तापमानात वाढ होण्याची कारणे हवामानशास्त्र विभागाने दिली आहेत. मागील महिन्यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात तापमानाने जेव्हा नीचांकी पातळी गाठली, तेव्हा आकाश निरभ्र होते. तसेच त्यावेळी उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेगही प्रतिताशी सहा किलोमीटर इतका होता. परंतु, सध्या हा वेगही बराच कमी झाला आहे. उत्तरेकडून वाहत येणारे वारे मंदावल्याने त्याचा परिणाम तापमान उंचाविण्यात झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. मागील चार ते पाच वर्षांतील नीचांकी पातळीचा आढावा घेतल्यास जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ही नोंद होत असल्याचे लक्षात येते.
यंदा नोव्हेंबरमध्येच तापमान आठ अंशापर्यंत घसरल्याने हंगाम संपुष्टात येईपर्यंत म्हणजे किमान दोन ते अडीच महिने हिवाळ्याचा आस्वाद घेता येईल अशी नागरिकांची धारणा होती. मात्र, हवामानात झालेल्या बदलांमुळे थंडीचा आस्वाद घेण्याची मनिषा बाळगणाऱ्यांचा हिरमोड झाल्याचे दिसत आहे. कारण, नोव्हेंबरच्या अखेरीस १४.५ अंशावर गेलेले तापमान अजूनही १२ अंशाच्या आसपास रेंगाळत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ही स्थिती असल्याने गायब झालेल्या थंडीचे कधी आगमन होणार याबद्दल सर्वसामान्यांनाही उत्सुकता आहे.
उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्यास आणि आकाश निरभ्र झाल्यास थंडीचे आगमन होईल, असे एकूण चित्र आहे.
उत्तरेकडील वाऱ्यावर थंडीचे पुनरागमन अवलंबून
नोव्हेंबरच्या मध्यावर नीचांकी तापमानाला स्पर्श करून थंडीने मारलेल्या दडीचा कालावधी लांबला असून तापमान १२ ते १४ अंशाच्या दरम्यान रेंगाळत असल्याने हवेतील गारवाही बराचसा कमी झाला आहे. रात्री व भल्या पहाटेचा अपवाद वगळल्यास दिवसा उन्हाळा असल्यागत वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आणि आकाश निरभ्र झाले तर थंडीचे
First published on: 08-12-2012 at 02:32 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter come back is depends on north air