विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त अवधी असला तरी त्यादृष्टीने पूर्वतयारी सुरू झाली आहे. आगामी ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून २००४ वाहने मागवण्यात आली आहेत. विधिमंडळ सचिवालयाचे कर्मचारी १ डिसेंबरला नागपुरात येणार असून दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी दरवर्षी मंत्री, राज्यमंत्री, विविध खात्याचे प्रधान सचिव आणि इतरही वरिष्ठ अधिकारी नागपुरात येतात. त्यांच्या वाहनांची व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून केली जाते. त्यासाठी राज्यभरातून शासनाच्या विविध विभागाकडून वाहने मागवण्यात येतात. यावर्षीही २००४ वाहनांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ५७२ कार, १३१८ जीप्स, ७१ ट्रक, ३३ टँकर, ७ मिनीबस व ३ मेटॅडोरचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्य़ातून ३२५ वाहने मागवण्यात आली असून त्यात १४२ कार, १५० जीप्स, १८ ट्रक, ९ टँकर तसेच ६ मिनीबसेसचा समावेश आहे. नाशिक व औरंगाबाद महसूल विभागातील वाहने २४ डिसेंबपर्यंत, तर विदर्भातील वाहने २५ डिसेंबपर्यंत येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.
आगामी ३० नोव्हेंबरपासून मुंबईचे सचिवालय नागपुरात स्थानांतरित करण्यात येणार आहे, तर कर्मचाऱ्यांचे आगमन १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच मंत्रालय ४ किंवा ५ डिसेंबपर्यंत येण्याची शक्यता आहे. येणऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या खोल्या खाली करण्यात आल्या आहेत. मंत्र्यांच्या संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी विधिमंडळाच्या इमारतीत सीसी टीव्ही कॅमेरे लावले जातात. यावर्षी १४ फिरते व २० स्थिर कॅमेरे लावण्यात येणार असून त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.