वाढत्या थंडीमुळे औरंगाबाद शहरासह जिल्हय़ातही सगळे वातावरण गारठले आहे. मराठवाडय़ातही ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटविल्या जात आहेत. सकाळी व संध्याकाळी उशिरा वर्दळीवर थंडीचा चांगलाच प्रभाव दिसून येत आहे. रोडावलेली वाहतूक व कमी होणारी गर्दी यातून हे चित्र पाहावयास मिळत आहे.
औरंगाबाद शहरातील सोमवारचे कमाल तपमान ९.८ अंश, तर किमान २९.६ अंश सेल्सिअस होते. बिबी का मकबरा, विद्यापीठ, हिमायतबाग अशा ठिकाणी सकाळी व संध्याकाळी पायी फिरावयास येणाऱ्यांना थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. अंगावर उबदार शाली, प्रावरणे घेऊनच घराबाहेर पडावे लागत आहे. आणखी काही दिवस थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. यंदा तुलनेने उशिरा थंडीचे आगमन झाले. डिसेंबरमध्ये बरेच दिवस थंडी जाणवत नव्हती. मात्र, डिसेंबर संपता संपता थंडीचा प्रभाव सुरू झाला आणि नवीन वर्षांच्या सुरुवातीपासून तो अधिकच वाढत गेला. दुष्काळ व पाणीटंचाईमुळे मराठवाडय़ात कमी-अधिक फरकाने सर्वत्र शेतीचे चित्र धूसर बनले आहे. उजाड माळराने व कोरडेठाक पाणवठे यामुळे एरवी थंडीच्या दिवसांत हमखास दिसणारी व सुखावणारी हिरवाई आता मात्र भयाण भासत आहे. सध्या भासणारी थंडीही प्रामुख्याने राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागात पसरलेल्या थंडीचा परिपाक आहे. बहुतेक ठिकाणचे रात्रीचे तापमान सरासरीच्या तुलनेत बरेच खाली आहे. हुडहुडी भरविणाऱ्या वातावरणाने आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांच्या वर्तुळातून वर्तविली जाते. सध्या तरी थंडीमुळे रोजच्या जनजीवनावर चांगलाच परिणाम झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

Story img Loader