विदर्भात गेल्या चार दिवसांत तापमानदर्शक यंत्रातील पारा चांगलाच घसरला असून कडाक्याच्या थंडीने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. गोंदिया व नागपूर गारठले आहे. शहरात धुक्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये थंडीला चांगली सुरुवात झाल्याने यंदाच्या हिवाळ्यात थंडीचा जोर वाढणार असे वाटत होते, त्यानंतर काही दिवसातच थंडीचा जोर ओसरला. आता पुन्हा गेल्या चार दिवसांत पारा अतिशय घसरला असून विदर्भात सर्वात कमी म्हणजे नागपूर शहरात सर्वात ६.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली.
उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्यावेळी राजकीय वातावरण चांगले तापले असताना त्या काळात थंडीने पळ काढला होता मात्र अधिवेशन आटोपताच थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका जाणवायला लागल्यामुळे शहरातील विविध भागात शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. विदर्भात अकोला १३.५, अमरावती ९.८ , ब्रम्हपुरी ११.९, चंद्रपूर १०.८, गोंदिया ९, वाशीम १२.२, वर्धा ९, यवतमाळ १०.२ नोंद करण्यात आली आहे. विदर्भात सर्वात कमी तापामानाची (६.६) नोंद नागपूर शहरात करण्यात आली आहे.
नागपुरात रविवारच्या तुलनेत सोमवारी सकाळपासून अधिक थंडी जाणवायला लागली आहे. सकाळपासून थंडे वारे वाहू लागले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह विदर्भाच्या काही भागात थंडीचा लाट कायम असून तापमान सरासरीपेक्षा खाली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार थंडीचा प्रकोप आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात आले. आला थंडीचा महिना.. झटपट शेकोटी पेटवा.. असे शहरवासी म्हणू लागले आहेत.
अचानक वाढलेल्या थंडीमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयांत रुग्णांची गर्दी होते आहे. दमा, ब्राँकॉयटीस या आजारांबरोबरच तापाचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच शहरातील विविध भागात असलेल्या अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या आणखी वाढल्या आहेत.
थंडीचा जोर वाढू लागल्याने ‘मॉर्निग वॉक ’ला जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली असून सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांनाही वाढत्या थंडीचा फ टका बसू लागला आहे. उबदार कपडय़ाच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढू लागली असून वेगवेगळ्या पद्धतीचे स्वेटर, शाल, टोप्या, हातमोजे, कानटोपी आदींची खरेदी केली जात आहे. गेल्या पाच सहा दिवसापासून उबदार कपडय़ांची विक्री वाढली आहे.
हुडहुडी पारा घसरला नागपूर ६.६
विदर्भात गेल्या चार दिवसांत तापमानदर्शक यंत्रातील पारा चांगलाच घसरला असून कडाक्याच्या थंडीने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. गोंदिया व नागपूर गारठले आहे. शहरात धुक्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
First published on: 25-12-2012 at 02:31 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter in nagpur temperture goes on 6 6 degree