विदर्भात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढत आहे. बुधवारी नागपूर शहरात विदर्भात सर्वात कमी ५.६ अंश से. तापमानाची नोंद करण्यात आली असून किमान तापमानाचा हा नीचांक आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात कमी झालेल्या थंडीचा जोर नव्या वर्षांत चांगलाच वाढला. आता तर नागपूरकर थंडीमुळे चांगलेच गारठले आहेत. शहरातील विविध भागात शेकोटय़ा पेटल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे.
उत्तर भारतातील वारे गारठा घेऊन आले आणि अवघ्या शहराला हुडहुडी भरली. गेल्या तीन दिवसापासून बोचऱ्या थंडीमुळे उबदार कपडे घातल्याशिवाय शहरवासी घराबाहेर पडू शकत नाही. सीताबर्डी, गोकुळपेठ भागातील एरवी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणारी दुकाने आता रात्री साडेनऊ वाजल्यानंतर बंद होतात. ग्राहकही फिरकत नसल्यामुळे मुख्य बाजारपेठही लवकरच बंद होते.
शहरात बुधवारी थंडीने कहर केला असून गेल्या काही वर्षांतील किमान तापमानाचा नीचांक गाठला आहे. विदर्भात अकोल्यामध्ये किमान १०.६, अमरावती ९.०, बुलढाणा १३.५, ब्रम्हपुरी १०, चंद्रपूर १२.४. गोंदिया ६.४, वाशीम १३, वर्धा ८.५, यवतमाळ ९.२ तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपूरच्या खालोखाल गोंदियामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मध्यभारतात थंडीची लाट आल्यामुळे वातावरणही ढगाळ आहे. येत्या काही दिवसात असेच वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. थंडीने जोरदार आगमन केल्यामुळे उबदार कपडय़ांची विक्रीही जोरात सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा