उत्तर भारतात थंडीने कहर केल्याने १४ जणांना प्राण गमवावे लागले. मात्र ढगाळ वातावरणाचे आवरण तयार झाल्याने नववर्षांच्या पूर्वसंध्येपासून नागपूरकरांना थंडीने दिलासा दिला. बुलढाण्यात रविवारी किंचित पावसाची भुरभुर अनुभवता आली. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढल्याने १४ जणांवर मृत्यूने घाला घातला. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात नागपूरकरांना थंडीने झपाटले होते. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये म्हणजे सोमवारपासून थंडीने थोडी उसंत घेतली आणि वातावरणात काहीसा तजेला निर्माण झाला. मंगळवारी पावसाने नागरिक साखर झोपेत असतानाच हजेरी लावत थंडीला पळवले. तसेही दिल्लीतील बलात्काराच्या घटनेमुळे तरुणाईने डीजेच्या तालावर नाचायचे टाळले. नवीन वर्षांचे स्वागत त्यांनी अगदी साधेपणाने, मध्यरात्रीला फटाके फोडून केले. नागपूरला ३१ डिसेंबरपूर्वी तीन दिवस चांगलेच थंडीने नागपूरला गारठवले होते. पारा ६.३ अंश सेल्सियसपर्यंत आल्याने आग ओकणाऱ्या सूर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात चक्क शेकोटी पेटवल्या गेल्या.  
ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात आद्र्रतेचे प्रमाण वाढले आहे. ढगाळ आणि दमट वातावरणात थंडीची भीती पार पळाली आहे. रविवारी आणि सोमवारी नागपूर शहराच्या तापमानात तीन-चार अंश सेल्सियसची वाढ झाल्याने ऊनी कपडे अंगावर घालण्याची फारशी गरज पडली नाही. ढगाळ वातावरणाने वाढलेले तापमान आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात नागपूरचा पारा साधारण ११ अंशांदरम्यान राहतो, असा अनुभव आहे. परंतु, दोन दिवसात तो १४ अंश सेल्सियसपर्यंत वाढ होऊ शकते.
दिल्लीच्या अशांत वातावरणात सोमवारी सकाळी ५.५ तापमानाची नोंद करण्यात आली. थंडी आणि धुक्यामुळे दिल्लीतील जनजीवन दरवर्षीच विस्कळीत होते. थंडी आणि धुक्यामुळे शहरातील वाहतुकीवरही परिणाम होतो. उत्तर प्रदेशात थंडीचा जोर कायम असून मोठय़ा प्रमाणावर बळी गेले आहेत. रेल्वे तसेच विमान वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या रेल्वे विलंबाने धावत आहेत. काही रेल्वेगाडय़ा दहा  तास उशिरा धावत असल्याने प्रवाशांचे थंडीत बेहाल झाले आहेत.
धुक्यामुळे विमानांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. धुक्यामुळे काही उड्डाणे रद्द करावी लागली तर काही विलंबाने सोडण्यात आली.