आठवडाभरापासून विदर्भात थंडीने बस्तान मांडले असून मंगळवारी नागपूर शहराचे तापमान १०.७ अंश सेल्सियसपर्यंत घसरले होते.
अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ शहराने दोन दिवसात हवामानातील बदल अनुभवले. दोन आठवडय़ांपूर्वी विदर्भातील तापमान सामान्य तापमानापेक्षा ५ अंश सेल्सियसने घसरले होते. डिसेंबरच्या प्रारंभी बोचरी थंडी आता जाणवू लागली आहे. विशेषत: रात्री थंडीची तीव्रता जाणवत असल्याने कानटोपी, स्वेटर, मफलर, हातमोज्यांचा वापर वाढला आहे.  
संपूर्ण विदर्भातच थंडीची लाट जाणवू लागली असून यवतमाळ शहरानेही किमान तापमानापेक्षा ५ अंश सेल्सियस एवढय़ा थंडीचा अनुभव नुकताच घेतला. निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्य़ातही पारा अचानक घसरल्याने लोकांना शेकोटय़ांचा आश्रय घ्यावा लागला.
चंद्रपूर शहराने मात्र यावेळी थंडीची फारशी तीव्रता अनुभवलेली नाही. ओपन कास्ट खाणींमुळे शहराचे तापमान ‘जैसे थे’ आहे. मंगळवारी चंद्रपुरात किमान १५.२ आणि कमाल ३०.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.  बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे विदर्भातील किमान तापमान येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी होऊ शकते. आंध्र प्रदेशात तापमान वाढलेले आहे. त्याचा परिणाम विदर्भाचे तापमान वाढण्यावर होऊ शकेल, असे हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
 नोव्हेंबर महिना सर्वाधिक थंडीचा म्हणून यंदा नोंदविण्यात आला. आज दिवसभर विचित्र हवामान होते. बोचरे वारे, उन्हाचा लपंडाव अशा वातावरणात थंडीही चांगली जाणवली. उल्लेखनीय म्हणजे १७ नोव्हेंबरला किमान तापमान १०.२ अंश सेल्सियस एवढे
नोंदले गेले होते. गेल्या दोन दशकातील हे सर्वात कमी तापमान असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.
त्यानंतर २९ नोव्हेंबरला तापमान १७ अंश सेल्सियस एवढे होते. तर ४ डिसेंबरला किमान तापमान १०.७ अंश सेल्सियस एवढे
घसरले.      

Story img Loader