दिवाळी संपतानाच कडाक्याची थंडी सुरू झाल्याने नगरकर गारठून गेले आहेत. गेले सलग तीन दिवस राज्यात निच्चांकी तापमान नोंदवल्यानंतर थंडीला आज वेगात वाहणाऱ्या वाऱ्याची जोड लाभल्याने गारठा चांगलाच वाढला आहे. नगरला आजही ७.९ अंश सेल्सिअस असे राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदवले गेल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली.
दिवाळीच्या काळातच शहर व परिसरात उत्तरेकडून वेगाने वाहणारे थंड वारे सुरू झाले होते. दोन, तीन दिवस हे वारे वाहिले. दिवाळी संपल्यानंतर मात्र एकदम कडाक्याच्या थंडीला सुरूवात झाली. शनिवारीच तापमानातील पारा १० अंश सेल्सीअसच्या खाली उतरला. रविवार व सोमवारी नगर शहरात राज्यातील निच्चांकी तापमान नोंदवले गेले.
थंडीची सुरूवातच कडाक्याने झाल्याने नगरकर चांगलेच गारठून गेले आहेत. एरवी डिसेंबर अखेरीस शहरासह जिल्ह्य़ात थंडीचा कडाका सुरू होतो. यंदा तब्बल महिनाभर आधीच वातावरण गारठून गेले आहे. दिवाळीनंतरच उत्तरेकडील वारे थांबले होते. आज तेही पुन्हा सुरू झाल्याने गारठा आणखीनच वाढला आहे. आज सकाळपासूनच थंड वारे वाहत आहेत. खालावलेले तापमान आणि वेगाने वाहणारे वारे यामुळे सकाळीच सुरू झालेली हुडहुडी दुपारी उन्हातही कमी झाली नव्हती.थंडीचा शहराच्या जनजीवनावरही बऱ्यापैकी परिणाम झाला आहे. विशेषत: सकाळचे व्यवहार लांबले आहेत. चांगलं उन्हं पडल्याशिवाय रस्त्यावर वर्दळ सुरू होत नाही. सायंकाळीही साधारणपणे असेच चित्र दिसते. दिवाळीची सुट्टी संपली असली तरी सकाळच्या शाळांमध्येही थंडीमुळे हजेरी अजूनही जेमतेम आहे. एकदम सुरू झालेल्या थंडीने सर्दी-खोकल्यासारखे आजारही वाढले आहेत. ऊबदार कपडय़ांची दुकानेही ग्राहकांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. रब्बी हंगामातील पिकांना, विशेषत: गव्हासाठी मात्र ही थंडी पोषक मानली जाते.

Story img Loader