पहाटेची हलकी थंडी कायम असतानाच मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासूनच उन्हे तापायला सुरुवात झाली आहे. पारा ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. खरा उन्हाळा सुरू होण्यापूर्वीची उन्हाची दाहकता बघता मार्च, एप्रिल व मे महिना चांगलाच तापणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहे.
दरवर्षी एप्रिलच्या मध्यानंतर उन्हाळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. मात्र, यंदा मार्चच्या शेवटच्या आठवडय़ातच उन्हे जाणवायला लागली आहेत. आताही पहाटे व सकाळची थंडी आणि गारवा कायम असला तरी दुपारी १२ वाजतानंतर ३८ अंश तापमानाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. दहावी-बारावीचे विद्यार्थी व पालकांवर परीक्षेची टांगती तलवार असतानाच, यावर्षी तापमानाचा उच्चांक गाठून लाही करणाऱ्या उन्हाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी ४८ अंश सेल्सिअसचा आकडा पार करत राज्यातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा म्हणून असलेली ओळख चंद्रपूर जिल्ह्याने कायम ठेवली. कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या, वीजनिर्मिती केंद्रे, डिफेन्स येथील आयुधनिर्मिती केंद्र, पोलाद प्रकल्प, विविध कारखाने शिवाय, सिमेंट काँक्रीटच्या घरांचे व फ्लॅट संस्कृतीचे वाढत्या आकर्षणामुळे लंबरूपात पडणाऱ्या सूर्यकिरणांची दाहकता अधिकच वाढत आहे. तुलनेने वृक्ष लागवड कमी होत असल्याने येथील वातावरणात थंडावा येत नाही.
गेल्या वर्षी उष्मघाताने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चिंतावह होती. त्यामुळे परीक्षेच्या सावटाखाली असलेल्या आपल्या पाल्यांची विशेष काळजी घेताना पालक दिसत आहेत. याही वर्षी लाही लाही करणाऱ्या उन्हाला तर सामोरे जावे लागणार नाही ना, अशी सामान्यांमध्ये दहशत पसरली आहे. उन्हापासून संरक्षण करणाऱ्या साधनांची रेलचेल बाजारात दिसू लागली आहे. सर्वसामान्यांना ग्रीष्मदाहापासून मुक्त करणाऱ्या कुलर व्यावसायिकांचा जोर वाढू लागला आहे.
गरीबांपासून तर श्रीमंतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या लाल, काळय़ा माठांचे ढिगारे बाजारातील आकर्षण बनले आहे. फळांच्या स्टॉल्सवर नव्याने आलेली रसाळ मोठमोठी टरबुजे, अंगूर डोळ्यांनाही गारवा देऊन जात आहेत. या उन्हाळ्यात त्वचा व डोळ्यांची खास निगा राखण्याची गरज आहे.
रस्त्यारस्त्यांवरून स्कार्फ बांधून व गॉगल्स लावून महिला वाहनधारकांचा ताफा धावताना दिसतो. रखरखत्या उन्हात आंब्याच्या झाडांवर बहरलेला मोहर सुखावून जात आहे. लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत प्रिय असलेले आईस्क्रीम विविध फ्लेवर्स व आकर्षक वेष्टनांमध्ये पार्लरमध्ये उपलब्ध आहे. आईस गोला, उसाचा रस, कुल्फी, लिंबाचे सरबतांना गाडय़ाही दिसत आहेत. मामाच्या गावाला जाऊ या, ही वृत्ती लोप पावल्याने उन्हाळ्याच्या सुटय़ा थंड हवेच्या ठिकाणी घालवण्याच्या पायंडा पडला आहे. त्यात कुलू मनाली, काश्मीर, महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा यासारख्या व इतरत्र जाणाऱ्या टूर अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय जोर धरला आहे. शिवाय, कुरडय़ा, पापड, चिप्स, चकल्या, यासारखे उन्हाळी पदार्थ करणाऱ्या गृहोद्योगही कामाला लागले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यत दिवसभर उन्हाच्या चटक्यांचा दाह
पहाटेची हलकी थंडी कायम असतानाच मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासूनच उन्हे तापायला सुरुवात झाली आहे.
First published on: 20-03-2015 at 02:52 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter summer situation in chandrapur