वीस वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली इगतपुरी नगरपालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्यात शिवसेनेचे   संजय   इंदुलकर    यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या   यशात    रिपाइं  व पर्यटन विकास आघाडीचाही वाटा आहे, हे नाकारता येणार नाही.
या निवडणुकीत प्रथम रिपाइंचे तीन उमेदवार निवडून आले, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसशी बंडखोरी करून नदीम खान यांनी पर्यटन विकास आघाडीची स्थापना केली. शिवसेनेच्या आधारे सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या नईमखान यांना स्वत: पराभवाचे धनी व्हावे लागले. आघाडीला मिळालेल्या वेगवेगळ्या निशाण्यांमुळे आघाडीतील सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. एकंदरीत निवडणुकीत संजय इंदुलकर यांची राजकीय खेळी पुन्हा यशस्वी झाली, असेच पाहावयास मिळाले.
निवडणूक जाहीर झाल्यापासून वादळी ठरली. प्रभाग रचनेस आरक्षण सोडतीतही कडवा विरोध झाला. प्रभाग रचनेमुळे हक्काचे मतदारसंघ दुसऱ्या प्रभागात गेल्याची ओरड झाली. संजय इंदुलकर यांची एकहाती सत्ता उलथवून टाकण्याचा चंग सर्वच विरोधकांनी बांधला होता. यासाठी व्यूहरचना आखली जात असतानाच काँग्रेसचे नईम खान यांनी स्वतंत्र पर्यटन विकास आघाडी स्थापन करून आपण शिवसेनेसोबत रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर करून सर्वाना धक्का दिला. काँग्रेस व राष्ट्रवादीची मदार आमदार निर्मला गावित आणि फिरोज पठाण यांच्यावर होती. काँग्रेसला सुरुवातीला बंडखोरीचा मोठा फटका बसल्याने काँग्रेसची अवस्था बिकट झाली. ऐन वेळी काँग्रेसला उमेदवार मिळणेही कठीण झाले.
त्यानंतर आ. गावित व पठाण यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करूनही त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही. परंतु उलट मागील तीन वर्षांपासून आ. गावित यांनी इगतपुरी शहरासाठी काय केले, हा विरोधकांचा प्रचार प्रभावी ठरला. या निवडणुकीत भाजप स्वबळावर उतरला, पण त्यांना यश आले नाही. मनसेही १९ पैकी १८ जागा लढविल्या. आ. वसंत गिते यांच्यासह नाशिकचे महापौर व नगरसेवक इगतपुरीत प्रचारासाठी फिरले. त्यामुळे मनसेचे किमान दोन ते तीन उमेदवार विजयी होतील असा जाणकारांचा अंदाज होता. मात्र, सर्वच अंदाज चुकवत मतदारांनी शिवसेनेच्या पारडय़ात भरभरून मतांचे दान टाकले.
मनसेचे खाते उघडले नसले तरी त्यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी नजरेत भरणारी असल्याने इगतपुरीत त्यांचा प्रभाव चांगलाच वाढल्याचे दिसून येते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत इगतपुरीकरांनी शिवसेनेवर विश्वास टाकल्याने आता सेनेची, प्रामुख्याने इंदुलकरांची, जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे इगतपुरीची विकास कामे व पाणी प्रश्न शिवसेनेचे सत्ताधारी कोणत्या पद्धतीने सोडवितात, यावर सर्वाचे लक्ष राहणार आहे आणि राजकीय विरोधी पक्षांची खेळी त्यावर आधारित राहील.

Story img Loader