डोंबिवली पूर्वेतील लोकमान्य टिळक चौक ते घरडा सर्कल या रस्त्याच्या सीमेंटीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या मार्जिन निश्चित नाहीत. प्रत्यक्षात रस्त्याची रूंदी ३० मीटर असताना २४ मीटर रस्त्याच्या मार्जिनमध्ये अतिक्रमणे न हटविताच पालिकेने हे काम हाती घेतले आहे. या रस्त्याखालील जल, मलनि:स्सारण व इतर वाहिन्यांचे स्थलांतर करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती न करताच मंजुनाथ शाळेजवळ रस्ता खोदून ठेवल्याने गेल्या २० ते २५ दिवसापासून या भागात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे.
डोंबिवलीतून कल्याणकडे सर्वाधिक वाहने या रस्त्यावरून येजा करतात. मंजुनाथ शाळेजवळील गोपाळ गल्ली क्र. २ जवळ पालिकेच्या अभियंत्यांनी कोणतेही नियोजन न करता जल, मलनि:स्सारण वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी रस्ता खोदण्याची घाई केली. या रस्त्याखाली अभूतपूर्व असे दबलेल्या वाहिन्यांचे जाळे असल्याने अभियंते चक्रावून गेले आहेत. या वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी ठेकेदार निवडीची निवीदा प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या कामाचा ठेकेदार निश्चित नसताना पालिका अभियंत्यांनी रस्त्याची खोदाई करण्याची घाई का केली? या कामासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून १०० टक्के अनुदान मिळणे आवश्यक होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्यक्षात या कामासाठी एकूण १० कोटीची गरज असताना, चालू वर्षांसाठी फक्त ४ कोटी रूपयांची तरतूद आहे. उर्वरित ६ कोटीचा निधी कोठून उभा करणार या विषयी अभियंते मूग गिळून बसले आहेत.
मंत्रालयातील एका बैठकीत या कामासाठी ९ टक्क्यांची तरतूद नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. मग, ही तरतूद ३ टक्के करण्याचे धाडस कोणी केले आहे, असे प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहेत.
पालिका अभियंते, रस्ते कामाचा ठेकेदार आणि आयुक्त यांच्यात कोणताही ताळमेळ नसल्याने ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते. रस्ते ठेकेदाराच्या कामाची मुदत केव्हाच संपली आहे. मुदतवाढ न देताच या कामाच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळेत हे काम करावे अशा नागरिकांच्या सुचनांची अभियंते दखल घेत नाहीत. ठेकेदाराच्या सहकार्याने वाहतूक विभागाने मंजुनाथ शाळेजवळ वाहतूक नियोजनासाठी ४ वॉर्डन नेमले आहेत. हे वॉर्डन ‘अन्य’ कामात अधिक गुंतले असल्याने सकाळ आणि संध्याकाळी घरडा सर्कल ते टिळक चौक वाहतूक कोंडीने गजबजलेला असतो. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत नोकरदार, शाळेच्या बस या कोंडीत अडकतात. नागरिकांना या रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे. या परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहनांची धूळ उडत असल्याने या भागातील नागरिकांना अनेक व्याधींनी ग्रस्त केले आहे. खोदाईच्या ठिकाणी बंद मशीनरी आणून काम सुरू असल्याचा फक्त देखावा उभा करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.
या प्रकल्पाचे अभियंता व आयुक्तांचे लाडके प्रमोद कुलकर्णी या कामाविषयी कमालीचे उदासीन असल्याने अन्य अभियंत्यांनी असहकाराचे धोरण स्वीकारले असल्याचे समजते. दरम्यान, डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील पाटकर रोड, रॉथ रोड व इतर सुस्थितीत असलेले रस्ते खोदून तेथेही चकाचक रस्ते करण्याच्या हालचाली पालिकेत सुरू आहेत.
ठेकेदाराची निवड न करताच रस्ते खोदाई
डोंबिवली पूर्वेतील लोकमान्य टिळक चौक ते घरडा सर्कल या रस्त्याच्या सीमेंटीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या मार्जिन निश्चित नाहीत. प्रत्यक्षात रस्त्याची रूंदी ३० मीटर असताना २४ मीटर रस्त्याच्या मार्जिनमध्ये अतिक्रमणे न हटविताच पालिकेने हे काम हाती घेतले आहे.
First published on: 23-01-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Without selecting contractor road digging in dombivli