पुणे- लोणावळा लोकल व स्थानकांवर तिकीट तपासणीच होत नसल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेच्या वतीने तिकीट तपासणीची एक विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत केवळ चारच दिवसांत ४८१ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख १९ हजार ६१४ रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या गाडय़ांची संख्या मागील काही वर्षांच्या तुलनेत सध्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यानुसार प्रवाशांचीही संख्या मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. अशा स्थितीत मनुष्यबळ मात्र पूर्वीप्रमाणेच आहे. त्यात तिकीट तपासनिसांची संख्याही कमी आहे. त्यामुळे पुणे स्थानकासह पुणे विभागातील सर्वच स्थानकांवर तिकीट तपासनीस अभावानेच दिसतात. लोणावळा लोकल त्याचप्रमाणे स्थानकावर तिकिटांची तपासणी होत नसल्याचा अनेक महिन्यांचा अनुभव आहे. तिकिटांची तपासणी होत नसल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही मागील काही दिवसांमध्ये वाढली आहे. विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्याच्या दृष्टीने पुणे विभागामध्ये एक विशेष मोहीम राबविण्यात आली. तळेगाव, शिवाजीनगर, चिंचवड, उरुळी आदी स्थानकांवर या मोहिमेअंतर्गत विनातिकीट प्रवासी शोधण्यात आले. विनातिकीट प्रवास करताना ४२० लोकांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून एक लाख, आठ हजार १९४ रुपये दंडाची वसुली करण्यात आली. द्वितीय वर्गाच्या तिकिटावर प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २१ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सहा हजार ४३६ रुपये दंड वसुली करण्यात आली. विनानोंदणी मालाची वाहतूक करणाऱ्या ४० लोकांनाही या मोहिमेत पकडण्यात आले. त्यांच्याकडून चार हजार ९८४ रुपये दंडाची वसुली करण्यात आली. पुढील काळातही अशा प्रकारची मोहीम सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.    

Story img Loader