अपुऱ्या मनुष्यबळामुळे पुणे- लोणावळा लोकलमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून तिकीट तपासणीस गायब झाले असून, तिकिटांची तपासणीच होत नसल्याने लोकलमध्ये फुकटय़ा प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी रेल्वेच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसत आहे. दरम्यान, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी प्रवासात कोठेही लोकल थांबवून अचानक तपासणी करण्याची योजना रेल्वेकडून हाती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुणे विभागातून सुटणाऱ्या रेल्वेच्या गाडय़ांची संख्या मागील काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गाडय़ा वाढल्या असतानाच व्यवस्थेवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. वाढत्या गाडय़ांच्या प्रमाणात मनुष्यबळ मात्र पुरेसे नसल्याचे कारण देण्यात येत आहे. पुणे विभागात असणाऱ्या तिकीट तपासणीस प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये त्याचप्रमाणे मुख्य स्थानकात थांबविण्याला प्राधान्य देण्यात येते. गाडय़ा वाढल्याने लांब पल्ल्याच्या त्याचप्रमाणे मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ांमध्येही तिकीट तपासणीस अपुरे पडत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून पुणे- लोणावळा लोकलमध्ये तिकीट तपासणीस फिरकतच नसल्याचे चित्र आहे. पूर्वी लोकलच्या प्रत्येक फेरीत अचानकपणे कोणत्याही डब्यामध्ये प्रवाशांच्या तिकिटांची किंवा पासची तपासणी केली जात होती. त्यामुळे विनाप्रवास प्रवास करणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. मात्र, सध्या लोकलमध्ये तिकीट तपासणीस येतच नसल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे. आता नव्या योजनेनुसार प्रवासात कोणत्याही स्थानकावर लोकल थांबवून प्रत्येक प्रवाशांच्या तिकिटाची तपासणी करण्यात येणार आहे.