* यंदा रंगपंचमीचे सामनेही रद्द
* येवलेकर देणार हरीण व गायींना पाणी
उत्तर महाराष्ट्रात पाणीटंचाईचे संकट भेडसावत असताना रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पोलीस यंत्रणेमार्फत शांतता समितीच्या बैठकीत पाण्याचा वापर न करता रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन येवल्यात नेहमीप्रमाणे रंगणाऱ्या रंगांच्या सामन्याला स्थगिती देण्याचा, तर निफाड तालुक्याने रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी बचत केले जाणारे पाणी येवलावासीयांकडून राजापूर येथील हरीण आणि गोशाळेतील गायींना दिले जाणार आहे.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत रंगपंचमी पाण्याचा अपव्यय न करता साजरी करावी, अशी जवळपास सर्वच राजकीय पक्षांची भूमिका आहे. काँग्रेसने रंगपंचमी कोरडय़ा पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन केले असताना राष्ट्रवादी काँग्रेसने या दिवशी पाण्याची नासाडी करणाऱ्यांचा निषेध करण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने रंगपंचमी साजरी न करता त्या निधीचा विनियोग दुष्काळग्रस्तांसाठी करण्याचे सूचित केले, तर मनसेने दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेण्याची संकल्पना मांडली आहे. राजकीय पातळीवर बिनपाण्याच्या रंगपंचमीवर मतैक्य झाले असताना, आता इतर घटकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद द्यावा, या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहेत. दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या गावांकडून त्यास प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. येवला शहरात यंदा रंगाचे सामने स्थगित करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा त्याचाच एक भाग. टॅक्टरवर सप्तरंगाचे पिंप भरून जोशात परस्परांवर त्याची उधळण करणारा खेळ म्हणजे हा सामना होय. त्यात विविध तालमी आणि मंडळाचे कार्यकर्ते सहभागी होतात. पाण्याची बचत करण्यासाठी रंगांच्या या सामन्यास स्थगिती देण्यात आली आहे. येवले शहराची रंगाचे सामने खेळण्याची पूर्वपरंपरा आहे. काही कारणास्तव मध्यंतरी बंद पडलेल्या परंपरेला ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी पुन्हा चालना दिली होती. परंतु, यंदा संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना रंगांचे सामने खेळणे उचित ठरेल काय, यावर बैठकीत चर्चा झाली.
परंपरा टिकविण्यासाठी रंगाचे सामने खेळले जावेत, असा तरुणांचा आग्रह होता. या सामन्याला विरोध करणाऱ्यांनी शहरात प्रथम पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोटय़ा लावाव्यात, साठवण तलावांलगतच्या विहिरीत होणारी अमाप गळती आणि पाणी विक्रीचा धंदा यावर नगरपालिकेने काय कारवाई केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शहरात रंगाचे सामने खेळले गेल्यास, राज्यभरात शहरवासीयांची प्रतिमा मलीन होईल याची जाणीव ज्येष्ठ नागरिकांनी करून दिली. बोअर किंवा पिण्यास अयोग्य पाणी वापरले तरी अखेर तो पाण्याचा अपव्यय ठरतो. पाण्याची बचत करून राजापूर येथील हरिणांसाठी व गोशाळेतील गायींसाठी पाण्याचा टँकर देण्यावर एकमत झाले. यंदा येवल्यात कोरडा रंग लावून हा सण साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निफाड तालुक्यातील ग्रामसभेत यंदा रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. तालुक्यातील अनेक गावांना टंचाईची झळ बसत आहे.
या स्थितीत रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा वापर करणे योग्य ठरणार नाही. यावर ग्रामस्थांचे एकमत होऊन रंगपंचमी पाण्याचा वापर न करता साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. देवळा पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीतही याच विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पाण्याचा वापर न करता रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी केले. आगामी काळातील होळी, रंगपंचमी, शिवजयंती व डॉ. आंबेडकर जयंतीचे उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहनही करण्यात आले. नाशिकप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रात टंचाईची स्थिती सारखी आहे. धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतही पाण्याचा वापर न करता याच धर्तीवर, रंगपंचमी साजरी व्हावी, याकरिता राजकीय पक्ष व पोलीस यंत्रणेकडून प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने पाण्याचा वापर न करता कपाळाला टिळा लावून रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.