भाजीपाल्याच्या चढय़ा दरांमुळे साधी पोळी-भाजीही महाग झालेल्या मुंबई व उपनगरातील ग्राहकांची सरकारतर्फे सुरू झालेल्या स्वस्त भाजीपाला विक्री केंद्रांवर झुंबड उडाली आहे. भाजीपाल्याची विक्री दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत सुरू असताना बुधवारी सकाळपासून भरपावसातही लोक या केंद्रावर भाजी खरेदीसाठी थडकत होते. ग्राहकांचा हा प्रतिसाद पाहून आता सकाळीही भाजी विक्री सुरू करण्याचा विचार सुरू झाला आहे. या भाजी केंद्रांमुळे आसपासच्या नेहमीच्या भाजीविक्रेत्यांनीही काही प्रमाणात आपले दर कमी करून रोजचा धंदा टिकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मुंबईतील सर्वसामान्यांची मोठी वस्ती असलेल्या लालबाग, परळ, करी रोड भागात अपना बाजार आणि सुपारी बाग ग्राहक केंद्रांवर भाजीखरेदीसाठी बुधवारी सकाळी भर पावसातही महिला येत होत्या. पण भाजीविक्री दुपारी चारनंतर असल्याचे कळल्यानंतर त्यांचा हिरमोड होत होता. दादर पूर्वेला राहणाऱ्या मधुमालती राजेशिर्के या आपल्या दोन-तीन शेजारी गृहिणींसोबत २० मिनिटांची पायपीट करत परळच्या अपना बाजारच्या केंद्रावर थडकल्या. पण मुळात त्या ठिकाणी भाजीविक्रीचे केंद्रच नव्हते. ‘भाजीविक्रीचे केंद्र नायगावच्या शाखेत आहे, पण तेथेही दुपारी चार ते आठ या वेळेत भाजी मिळेल. त्याचवेळी जा’ अशी सूचना तेथील कर्मचाऱ्यांनी या महिलांना केली. त्यावर चला आता नायगावला संध्याकाळी जाऊ असा सामूहिक निर्णय झाला. नेहमीच्या भाजीविक्रेत्यांच्या तुलनेत जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी या केंद्रांवर भाजी स्वस्त आहे असे वर्तमानपत्रातील दरांवरून लक्षात आले. त्यामुळेच या ठिकाणी आल्याचे त्यांनी सांगितले. सुपारी बाग येथील शाखेवरही असेच चित्र होते. स्वस्त भाजीविक्रीच्या चौकशीसाठी सतत लोक येत होते.
मुलुंड येथील अपना बाजार येथे अवघ्या दोन-तीन तासांत भाजी संपली. त्यामुळे अनेक ग्राहकांना निराश होऊन परतावे लागले. इतक्या कमी वेळात ९०० किलो (सुमारे एक टन) भाजीची विक्री झाली. सध्या दुपारी ४ नंतर भाजी विक्री केली जात आहे. मात्र ग्राहकांच्या प्रतिसादामुळे आता सकाळीही भाजी विक्री सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती येथील सहाय्यक व्यवस्थापक उदय गांधी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. स्वस्त भाजी विक्री संदर्भात चौकशी करण्यासाठी बुधवारी दुपापर्यंत किमान साठ दूरध्वनी येऊन गेल्याचे गांधी म्हणाले. भाजीच्या वजनासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे ठेवल्याने ग्राहकांनाही आपली फसवणूक होत नसल्याचे समाधान मिळत            आहे.  
स्वस्त भाजी केंद्रावरील दर
कांदा- २५ रुपये किलो, बटाटा-१५ रुपये किलो, टोमॅटो- ४० रुपये किलो, कोबी-२० रुपये किलो, कोथींबिरीची मोठी जुडी- ७ रुपये, भेंडी-४० रुपये किलो, फ्लॉवर- २८ रुपये किलो

मुंबई व उपनगरातील किरकोळ भाजी विक्रेत्यांकडील दर
वांगी ४० रुपये किलो, कोबी ४० रुपये किलो, फरसबी ३० रुपये किलो, बटाटा २० रुपये किलो, कांदा – २८ ते ३० रुपये किलो.
रयत बाजार सुरू करा
ग्राहकांची लूट करणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याऐवजी काही भाजीविक्री केंद्र सुरू करण्याचा सरकारचा निर्णय मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. या तात्पुरत्या उपाययोजनेपेक्षा ग्राहकांना नेहमीच रास्त दरात भाजीपाला मिळेल यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर मुंबईत रयत बाजार सुरू करावेत, अशी मागणी मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी केली. त्यामुळे शेतकरी आपला भाजीपाला आणून विकू शकतील. त्यांनाही थोडे जास्त उत्पन्न होईल व ग्राहकांना सध्याच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी दरात भाजीपाला मिळेल, याकडे नारकर यांनी लक्ष वेधले.

Story img Loader