पीएमपीएलच्या बसचालकाच्या बेशिस्तीमुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ पादचारी महिलेला सोमवारी दुपारी जीव गमवावा लागला. चालकाने नो एन्ट्रीमध्ये बस नेल्यामुळे महापालिकेच्या समोरच्या प्रवेशद्वाराजवळ बसच्या चाकाखाली सापडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चालकास अटक केली आहे. गेल्या अकरा महिन्यांत पीएमपीएल बसने घेतलेा हा विसावा बळी आहे.
उषा तुकाराम गायकवाड (वय ३८, रा. बिबवेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड या गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेत अन्न परवाना विभागात शिपाई म्हणून कामाला होत्या. गायकवाड यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या त्यांच्या जागेवर कामाला लागल्या होत्या. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास पुणे महानगरपालिकेत जेवण झाल्यानंतर त्या चहा पिण्यासाठी पालिकेसमोर असलेल्या हॉटेलमध्ये गेल्या होत्या. येथील झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत असताना शिवाजीनगरकडून आलेली बस नो एन्ट्रीतून आली. या बसची धडक लागून त्या खाली पडल्या. पीएमपीच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली आल्या. त्यानंतरही बसचालक बस तशीच घेऊन जात असताना नागरिकांनी त्याला अडवले. गायकवाड यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गायकवाड यांना तीन मुली व एक मुलगा आहे. मोठय़ा मुलीचे लग्न झाले असून इतर दोन मुली शिकत आहेत.
घटना घडली त्या चौकात अपघाताची ही तिसरी घटना असून या ठिकाणी वाहतूक पोलीस नसतो. नो एन्ट्रीचा फलक असताना सर्रासपणे बस व इतर वाहने या रस्त्यावरून जातात. त्यामुळे पायी चालणाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण असते, असे येथील दुकानदारांनी सांगितले. याबाबत शिवाजीनगर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक महेश सरतापे यांनी सांगितले, की बसचालक विलास गणपत कुंभार (वय ४८, रा. ताथवडे) याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रात्री अटक करण्यात आली आहे.

अपघात झालेल्या ठिकाणी सगळय़ाच वाहनांना नो एन्ट्री आहे. शहरात अशी काही ठिकाणे आहेत, मात्र कमी मनुष्यबळ असल्यामुळे त्या ठिकाणी कायस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमणे शक्य नाही. मात्र, लवकर वाहतूक शाखेला मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.

Story img Loader