उरण तालुक्यात स्वाईन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उरणमधील वेश्वी गावातील प्रमिला काना पाटील असे या महिलेचे नाव असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. उरणमध्ये स्वाईन फ्लूचा हा पहिला बळी आहे.
उरणमधील वेश्वी गावातील प्रमिला काना पाटील ही तापाने आजारी पडल्याने तिला उरण, पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वाईन फ्लू असल्याचे निदान झाल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. परंतु तेथे उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने तिला पुढील उपचारांसाठी नवी मुंबईतील डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याची माहिती उरणचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन संकपाळ यांनी दिली.
प्रमिला पाटील हिच्या घरातील तिची तीन भावंडे व आई-वडील अशा पाच जणांचीही तपासणी करण्यात आली. त्यांच्याबाबत दक्षता घेतली जात असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. स्वाईन फ्लूने झालेल्या महिलेच्या मृत्यूमुळे उरण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. मात्र दक्षता म्हणून उरणमधील आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.