डोंबिवलीत काही उद्दाम, मग्रूर रिक्षाचालक प्रवाशांना मागणीप्रमाणे प्रवासी वाहतुकीस नकार देत आहेत. काही रिक्षाचालक मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्यास नकार देत आहेत. तर काही सरासरी भाडे आकारून प्रवाशांची लुबाडणूक करीत असल्याचे प्रकार डोंबिवलीतील एका जागरूक महिलेने गेल्या आठवडय़ापासून उघड करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांच्या नंबरचे मोबाइलने छायाचित्र काढून ते कल्याणच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना कळविण्यात येत आहेत. मृणाल जोशी या जागरूक महिलेने रिक्षाचालकांचा हा मनमानी, मग्रूर आणि उद्दामपणा उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) तसेच वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आरटीओ, वाहतूक पोलीसही सतर्क झाले आहेत. गेल्या आठवडय़ात एमएच-०५-बीजी-३६७ या क्रमांकाच्या रिक्षाचालकाने जोशी यांना मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीस नकार दिला. तात्काळ त्या चालकाची तक्रार आरटीओ संजय डोळे यांना करण्यात आली. डोळे यांनी त्या रिक्षाचालकाचा पत्ता हुडकून त्याच्यावर कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली. या चालकाला कायद्याप्रमाणे सुमारे सहा ते सात हजार रुपये दंड होऊ शकतो, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाई टाळण्यासाठी हा रिक्षाचालक आता गयावया करीत असल्याचे सांगण्यात येते. एमएच-०५-के-४५८८, एमएच-०५-के-६१८६ या क्रमांकाच्या रिक्षाचालकांनी पूर्व भागातून पश्चिमेकडे येण्यास नकार दिल्याने त्यांची तक्रार आरटीओ कल्याण कार्यालयात करण्यात आली आहे. एमएच-०५-डी-९१६७ या रिक्षाचालकाच्या रिक्षेचा मीटर चोरून नेण्यात आला आहे. या चालकाने मात्र प्रामाणिकपणे ज्या अंतरासाठी ४० रुपये भाडे घेतात, त्या अंतरासाठी फक्त १९ रुपये भाडे घेतले. त्यामुळे काही प्रामाणिक रिक्षाचालकही आहेत. फक्त त्यांचा मीटर खरेच चोरीला गेला आहे का, याची चौकशी आरटीओ अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी मृणाल जोशी यांनी केली आहे. रिक्षाचालकांकडून उद्दामपणाचा अनुभव घेणाऱ्या प्रवाशांनी थेट आरटीओ कार्यालयाशी ९८६७६०७७५७ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उद्दाम रिक्षाचालकांना रणरागिणीचा हिसका
डोंबिवलीत काही उद्दाम, मग्रूर रिक्षाचालक प्रवाशांना मागणीप्रमाणे प्रवासी वाहतुकीस नकार देत आहेत. काही रिक्षाचालक मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्यास नकार देत आहेत.
First published on: 15-03-2013 at 12:44 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman hitch to arrogant rikshaw driver