महिलांवरील अत्याचाराविरोधात आता महिलांनीच पुढे येण्याची गरज असून कौटुंबिक अत्याचार टाळण्यासाठी महिलांची भूमिका समन्वयाची असावी, असा सल्ला मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक शिवणकर यांनी दिला आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मराठी वैभव सामाजिक संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्य जिल्ह्य़ात ठिकठिकाणी कायदेविषयक माहिती शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोपीय कार्यक्रम बुधवारी झाला. याप्रसंगी मुख्य न्यायाधीश शिवणकर, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व दिवाणी न्यायाधीश एस.एस.यल्लटी व अॅड. विनय घुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिलांवरील अत्याचार ही बाब पूर्वीपासून चालत आलेली आहे. त्यावेळी समाजाच्या भीतीने अशी प्रकरणे दाबून टाकली जात, मात्र माध्यमांच्या सतर्कतेने व पीडितांच्या तक्रारीने या प्रकरणाला आवाज मिळत आहे. हा सामाजिक बदल स्वागतार्ह आहे. विनयभंग, बलात्कार अशा प्रकरणात महिला, युवती व तिचे कुटुंबीय पुढे येऊन बोलत आहेत. त्यांचा आवाज प्रखर करण्याचे काम महिलांनाच करायचे आहे, मात्र कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी, स्त्रीभृणहत्या अशा प्रकरणात महिलांचीच भूमिका महत्वाची ठरते. सुनेमुळे वेगळ्या राहणाऱ्या मुलांकडून उदरनिर्वाहासाठी पोटगी मागणाऱ्या आईचे प्रकरण पाहिले की, यात स्त्रीचा दोष प्रामुख्याने असल्याचे दिसून येते. स्त्रीभृण हत्येमध्ये पतीएवढीच पत्नीही जबाबदार असते. त्यामुळे नात्यातील समन्वय साधण्याची, तसेच एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेण्याची अधिक गरज आज भासत आहे, अशी टिपणी न्या. शिवणकर यांनी केली.
न्या. यल्लटी यांनी आत्मनिर्भर होऊन स्वत:चे रक्षण करण्याचा सल्ला उपस्थित महिलांना दिला. पीडित महिलांना सल्ला व मदत देण्याचे काम प्राधिकरणामार्फत होते. त्यामुळे त्यांनी अत्याचाराविरोधात पुढे यावे, असेही त्यांनी सुचविले. याप्रसंगी संस्थेची रौप्यमहोत्सव वाटचाल सुरू झाल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
बचतगट, दारूबंदी, समाजसेवेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. इंदिरानगर येथील झोपडपट्टीत वाहणारा दारूचा महापूर रात्ररात्र जागून बंद करणाऱ्या राणी दुर्गावती महिला मंडळाच्या निरक्षर व मागास वर्गातील महिलांचे पाहुण्यांनी विशेष कौतुक केले.
या सर्व २५ महिलांना पोलीसमित्र म्हणून बॅचेस मिळाले असल्याचे पालिका सभापती प्रफु ल्ल शर्मा यांनी नमूद केले. आयोजक संस्थाध्यक्ष अरविंद वानखेडे यांनी संस्थेची वाटचाल विशद केली.
पाहुण्यांचे स्वागत वानखेडे व कापुरे यांनी केले. या कार्यक्रमानंतर सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आंनद उपस्थित पाहुण्यांनी घेतला.
‘कौटुंबिक अत्याचार टाळण्यासाठी महिलांची भूमिका समन्वयी असावी’
महिलांवरील अत्याचाराविरोधात आता महिलांनीच पुढे येण्याची गरज असून कौटुंबिक अत्याचार टाळण्यासाठी महिलांची भूमिका समन्वयाची असावी, असा सल्ला मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक शिवणकर यांनी दिला आहे.
First published on: 16-03-2013 at 03:13 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman role should be co ordinery to avoid family outrage