धावत्या लोकलमध्ये महिलांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर पश्चिम रेल्वेने महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एका गाडीत महिलांच्या डब्यात प्रायोगिक तत्त्वावर कॅमेरे बसवण्यातही आले. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी सरसकट सर्वच गाडय़ांच्या महिला डब्यांमध्ये करण्यास महिलांनी सक्त विरोध केला आहे. महिलांच्या डब्यातील सीसीटीव्ही कॅमेरा हा महिलांच्या ‘प्रायव्हसी’वर घाला आहे, अशी ओरड करीत महिला प्रवासी संघटनांनीच या प्रस्तावाला विरोध केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी पंधरवडय़ाच्या काळात चालत्या लोकल गाडय़ांमधील महिलांच्या डब्यात महिलांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडल्या होत्या. या डब्यांमध्ये पोलीस कर्मचारी नियुक्त करता येईल का, याचीही चाचपणी झाली होती. मात्र रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल या दोघांकडेही असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे हे शक्य नसल्याचे आढळले होते.
त्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेने एका गाडीत महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या कॅमेरांद्वारे थेट प्रक्षेपण बघता येणे शक्य नसले, तरीही गुन्ह्य़ाचा तपास करताना त्या चित्रीकरणाची मदत होऊ शकते. आता पश्चिम रेल्वेच्या धर्तीवर मध्य रेल्वेवरही एका गाडीच्या महिला डब्यात हे कॅमेरे बसवण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत होते. मात्र महिला संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
महिलांच्या डब्यात महिला नि:शंकपणे वावरत असतात. खास महिलांसाठीचे अनेक उपक्रमही एक-दीड तासाच्या प्रवासात राबवले जातात. बऱ्याचदा दुपारच्या वेळेत महिला ऐसपैस आरामात बसलेल्या असतात. अशा वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आमच्या खासगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणारी ठरू शकते, असे काही महिला प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
दुसऱ्या बाजूला, या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण थेट पाहता येणार नसल्याने प्रत्यक्ष गुन्हा घडताना या कॅमेऱ्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे महिलांना या कॅमेऱ्याचा फायदा सुरक्षेसाठी अजिबातच होणार नाही. मग हा कॅमेरा हवाच कशाला, असा सवाल विचारला जात आहे. विशेष म्हणजे महिलांच्या डब्याबरोबरच पुरुषांच्याही डब्यात हे कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणीही समोर येत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना महिलाच सुरुंग लावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आणखी सहा गाडय़ांत कॅमेरे
महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आमचा निर्णय योग्यच आहे. या निर्णयामुळे गुन्हा घडतानाच रोखता आला नाही, तरी भविष्यातील अनेक गुन्हे कमी होऊ शकतात. लोकलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण थेट पाहणे खूपच कठीण आहे. पण या चित्रीकरणाच्या मदतीने अनेक गुन्ह्य़ांना आळा घालता येऊ शकतो. त्यामुळेच आणखी सहा गाडय़ांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
शैलेंद्रकुमार
विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे
सीसीटीव्हीची नजर ना लगे
धावत्या लोकलमध्ये महिलांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर पश्चिम रेल्वेने महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-11-2013 at 06:34 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womans against the facility of cctv camera in ladies compartment