स्थानिक स्वराज्य संस्थांकडून महिला आणि बाल कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अभ्यासाचे निमित्त साधत मुंबई महापालिकेतील २९ नगरसेविका विमानाने केरळ सफरीला जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांच्यासोबत तीन महिला अधिकारीही जात आहेत. या दौऱ्यासाठी पालिकेच्या तिजोरीतील लाखो रुपये उधळण्यात येणार आहेत. मात्र केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून ही रक्कम वळती करून घेण्यात येणार आहे. परंतु हा अभ्यास दौरा मुंबईतील महिला आणि बालकांसाठी कितपत फायदेशीर ठरेल हे गुलदस्त्यातच आहे.
केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्था महिला आणि बाल कल्याणासाठी कोणकोणत्या योजना राबवितात, या योजनांच्या माध्यमांतून महिलांना किती रोजगार उपलब्ध होतो, महिला आणि बालकांच्या आरोग्याची कशी काळजी घेतली जाते, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाच्या योजना, महिलांसाठी प्रोत्साहनपर योजनांच्या अभ्यासाचे निमित्त साधून महिला आणि बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा आणि सर्व सदस्य नगरसेविका येत्या २० ते २३ जानेवारी दरम्यान दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत पालिकेतील तीन महिला अधिकारीही केरळला जाणार आहेत.
महिला आणि बाल कल्याण समितीच्या सदस्यांची संख्या ३६ असून त्यापैकी २९ नगरसेविकांनी केरळला जाण्याची तयारी दाखविली आहे. सात नगरसेविकांनी अद्याप काही कळविलेले नाही. जनतेच्या पैशांची उधळपट्टी होऊ नये यासाठी कोणत्याही दौऱ्यावर जाण्यास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी मनाई केली आहे. त्यामुळे महिला आणि बाल कल्याण समितीमधील मनसेच्या पाच नगरसेविकांनी दौऱ्याबाबत काहीच कळविलेले नाही.
नगरसेविका आणि महिला अधिकारी अशा एकूण किती जणी केरळला जाणार याबाबत अद्याप अनिश्चितता असल्यामुळे नेमक्या किती जणींचे विमानाचे तिकीट काढावयाचे, किती जणींच्या निवासाची व्यवस्था केरळमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये करायची याबाबत पालिकेचा राजशिष्ठाचार विभाग बुचकळ्यात पडला आहे.
महिला आणि बाल कल्याणासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात १५ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामधूनच या दौऱ्याचा खर्च करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले. तर केंद्र सरकारकडून महिला आणि बाल कल्याणासाठी देण्यात येणाऱ्या निधीमधून दौऱ्याचा खर्च करण्यात येणार असल्याचे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. नगरसेवकांच्या अभ्यास दौऱ्यांचा आजपर्यंत मुंबईकरांना काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे केरळ दौऱ्यावर पैशांची उधळपट्टी करण्याऐवजी ती रक्कम महिला आणि बाल कल्याणासाठी वापरावी, अशी चर्चा केरळ दौऱ्याच्या तयारीच्या निमित्ताने पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा