मुंबईत शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ यांच्याबाबतीत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केला जात आहे. नेमका तसाच प्रकार २००५ मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविकांच्या नशिबी आला होता. या नगरसेविकांनीही वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र या तक्रारींची कोणतीही दखल ‘मातोश्री’ने घेतली नाही. शीतल म्हात्रे प्रकरणामुळे तब्बल आठ वर्षांपूर्वीचा घटनाक्रम पुन्हा चर्चेत येऊ लागला असून महापालिकेतील काही महिला नगरसेविका या प्रश्नावर पुन्हा एकदा जुना राग आळवू लागल्या आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेत जकात कायम ठेवायची की नाही या विषयावर चर्चा सुरू होती. शिवसेनेच्या तत्कालीन नगरसेविका वैशाली दरेकर (आता मनसे), कविता म्हात्रे (सेना), विजया पोटे (सेना), क्षमा मुणगेकर यांनी जकात ठेक्याला कडाडून विरोध केला होता. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे ठेकेदार कंपनीशी चांगलेच सूत जुळल्याची तेव्हा चर्चा होती. हे लक्षात न घेता चौघींनी आक्रमक भूमिका घेतल्याने चारही नगरसेविकांना सेनेच्या काही नगरसेविकांनी दटावणी, धमक्या दिल्या. या नगरसेविकांनी या प्रकाराबद्दल मातोश्रीवर संपर्क साधला, फॅक्स पाठविले. मात्र कोणतीही कारवाई झाली नव्हती, अशी आठवण ‘त्या’ पीडित नगरसेविकांनी वृत्तान्तशी बोलताना सांगितली.
वाद चिघळल्यानंतर तत्कालीन नेते मधुकर सरपोतदार यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्येही आमची बोळवण करण्यात आली. अशी ही ‘ठेक्याची’ पाठराखण करणारी नीती सेनेत पहिल्यापासून आहे, असा टोलाही यापैकी काही नगरसेविकांनी लगावला. त्याचे चटके आम्हाला नंतर बसले. निवडणुकीत उमेदवारी न देणे, बदनामी करणे, अपक्ष म्हणून लढताना पराभूत करण्यासाठी यंत्रणा राबविणे अशा पद्धतीने सेनेच्या काही मंडळींनी आम्हाला त्रास दिल्याचे वैशाली दरेकर यांनी सांगितले. त्यामुळे शीतल म्हात्रे, डॉ. राऊळ यांच्याबाबतीत जो प्रकार घडला आहे तो फक्त ‘कालचक्रा’चा फेरा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.