नागपूर ग्रामीण पोलिसांचा पुढाकार
दिल्लीतील विकृत घटनेचे पडसाद जनमाणसाच्या मन:पटलावर उमटले असताना महिला अत्याचारांची प्रकरणे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी समाजातील काही संवेदनशील नागरिकही पुढे सरसावत आहेत. स्वयं पोलिसांनी महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे.
नागपूर ग्रामीण पोलीस आणि राम इंगोले यांच्या आम्रपाली उत्कर्ष संघाच्यावतीने एकूण ३७ गावातील महिला, शाळा, महाविद्यालये, महिला ऑटो रिक्षाचालक, महिला बचत गट, महिला कराटे पटू आणि विद्यार्थिंनी हजारोंच्या संख्येने ‘महिला उत्कर्ष अभियाना’च्या गरजेवर शिक्कामोर्तब केले आहे. देशभरात महानगरे, शहर, गाव, वस्तीतील लहान मुली व महिलाही असुरक्षित जीवन जगत असून त्यांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आता महिला आणि पुरुषांनी संयुक्तपणे पुढे सरसावले पाहिजे, असा संदेश देणाऱ्या या अभियानाची मुहूर्तमेढ ‘गाव शिवार संरक्षण आणि महिला सक्षमीकरण’ या तीन दिवसांच्या शिबिरात
झाली.
इंगोले यांनी ही संकल्पना उचलून धरीत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर बोलवून कुही भागातील महिला, विद्यार्थिनी, बचत गटांच्या महिलांना अत्याचाराची जाणीव करून देण्याबरोबरच अत्याचाराच्या विरोधात उभ्या असलेल्या महिलांवरील आपबितीही या शिबिरात उपस्थित महिलांपर्यंत पोहोचवण्यात आली. महिला अत्याचार आणि सुरक्षेच्या प्रश्नावर विविधांगी चर्चा होऊन अनेक प्रश्नही महिलांच्यावतीने याठिकाणी उपस्थित करण्यात आले.
वळद गावच्या मोना फुलझेले या तरुणीने त्यांच्या गावात व त्याचप्रमाणे इतरही अनेक गावात असलेल्या दारूच्या गुत्त्यांमुळे गावाची शांतता भंग होण्याबरोबरच तेथील तरुणींना व महिलांवर येणाऱ्या संकटांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली. सर्वच क्षेत्रातील संवेदनशील नागरिकांनी अत्याचाराच्या विरोधात उभे राहून महिलांना सन्मानाने जगण्याची परिस्थिती निर्माण करण्याची गरज पोलीस विभागातून उपस्थित असलेल्या विविध पदाधिकाऱ्यांनी प्रकर्षांने नमूद केले. गावपातळीवर महिलांमध्ये जनजागृती करणे हा स्तुत्य उपक्रम असला तरी गावातील जातीभेदातून होणारे अत्याचार, दारूमुळे होणारे गुन्हे आणि शहराप्रमाणेच वस्ती किंवा गावातीलच नातेवाईक किंवा गावकऱ्यांकडून होणारे अत्याचाराची माहिती पुढे येणे गरजेचे असते.
गावात गुन्हेगारी मानसिकता असलेली माणसे पोलिसांना माहिती असतात. निदान गुन्ह्य़ांची खरी माहिती जरी पोलिसांपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून आली तरी पुढील तपास त्यामुळे सोपा होईल आणि अभियानाची ती फलश्रुती ठरेल, असे मत मनोजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा