अखिल भारतीय स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र संघटना आणि ‘एनओजीएस’ यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये ‘वर्ल्ड काँग्रेस अ‍ॅन्ड डिलिमास इन ओबी-जीवाय’ या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ आणि परिषदेच्या संयोजक डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना प्रत्येक ‘माता व नवजात अर्भकाला जपा’ अशी आहे. परिषदेच्या माध्यमातून या क्षेत्रातील डॉक्टरांना त्यांच्या नव्या कल्पना चर्चात्मक पद्धतीने सोडविता येतील. या परिषदेनंतर स्त्रीरोग क्षेत्रात नवा पायंडा पडणार असल्याची शक्यता डॉ. श्रीखंडे यांनी व्यक्त केली. या परिषदेमध्ये २० आंतरराष्ट्रीय तसेच दहा राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ व १५०० डॉक्टर सहभागी होणार आहेत. विदेशातील तज्ज्ञांची विविध विषयांवर भाषणे होणार आहेत. या परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या डॉक्टरांना मेडिकल कौन्सिलने सहा तासांचे क्रेडिट अवर्स देण्याचे मान्य केले आहे.
भारतात सध्या आसाम, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व पश्चिम बंगालमध्ये माता मृत्यूदर अधिक आहे. २०१५ पर्यंत हा दर कमी करण्याचा सरकारचा व संस्थेचा मानस आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना प्रशिक्षित करण्याचे काम एनओजीएस व फॉग्सी या संस्थेतर्फे करण्यात येणार आहेत. आता सरकारने घरात होणारी प्रसुती बंद करून ते हॉस्पिटलमध्ये व्हावी, असे धोरण स्वीकारले आहे. परिषद ३० नोव्हेंबरला सुरू होणार असली तरी परिषदेचे उद्घाटन १ डिसेंबरला दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी डॉ. चंद्रकात रुपारेल, डॉ. आलोक वशिष्ठ व फॉग्सीचे अध्यक्ष डॉ. पी.के. शहा उपस्थित राहणार आहेत. १ डिसेंबर हा विश्व एड्स दिन असल्यामुळे नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दुपारी ४.३० वाजता होणार असून त्यात नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला डॉ. अंकिता कोठे, डॉ. वैदेही मराठे, डॉ. रितू दरगन उपस्थित होते.