शेजारच्या गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यात आज दुपारी पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. या महिलेचा मृतदेह पळवून नेण्यात नक्षलवादी यशस्वी ठरले, असा दावा पोलिसांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या जिल्ह्य़ात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये होणाऱ्या चकमकींमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील जांबीयागट्टा परिसरात चकमक उडाली होती. यानंतर नक्षलवादी याच भागात तळ ठोकून असल्याचे लक्षात आल्यामुळे सी-६० च्या जवानांनी छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या भागात शोध मोहीम हाती घेतली होती. आज दुपारी तीनच्या सुमारास हे जवान भामरागड तालुक्यातील हिकेर गावाजवळच्या जंगलात शोध मोहीम राबवत असतांना अचानक नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने सुरू असलेला हा गोळीबार एक तास सुरू होता. यात सी-६० च्या जवानांनी झाडलेली एक गोळी समोर असलेल्या एका महिला नक्षलवाद्याच्या पोटातून आरपार गेली. ही महिला ठार होताच नक्षलवाद्यांनी तिचा मृतदेह घेऊन जंगलाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीतून शेजारच्या छत्तीसगडमध्ये पळ काढला. यानंतर जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे या महिलेच्या पोटातील अवयव आढळून आले. या चकमकीनंतर या भागात पुन्हा मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा