छत्रपती शिवाजी सर्वाेपचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या दोघा सहकाऱ्यांनी चोप दिल्याच्या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) सोलापूर शाखेने निषेध नोंदवत संबधित पोलिसांविरुद्ध डॉक्टर संरक्षण कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तर याउलट, संबंधित निवासी डॉक्टरच्या हलगर्जीपणाबद्दल त्याच्या विरुद्ध कारवाई व्हावी म्हणून राज्य महिला आयोग व मानवाधिकार आयोगाकडे धाव घेण्यात आली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. सुनील वैद्य यांनी निवासी डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पोलिसांसह डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांनी चुकीच्या पद्धतीने परिस्थिती हाताळल्याबद्दल त्यांचाही निषेध नोंदविला आहे. याबाबत आपली भूमिका डॉ. वैद्य यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शहरातील सर्व डॉक्टरांनी काळय़ा फिती लावून काम केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मार्ड संघटनेची सोलापूर शाखा व डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयीतील वैद्यकीय शिक्षक संघटनेने ३१ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेची पाश्र्वभूमी पत्रकार परिषदेत विशद करताना पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांना दोष दिला. निवासी डॉक्टर प्रशांत पाटील हे तीन महिन्यांपूर्वी शल्यचिकित्सा विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी रुजू झाले असून, घटनेच्या वेळी ते एका अपघातातील गंभीर जखमी झालेल्या रुग्णावर वैद्यकीय उपचार करण्यात व्यस्त असताना पोलीस निरीक्षक वायकर यांनी हातातील रुग्ण सोडून प्रसूतीसाठी आलेल्या दुसऱ्या विभागातील महिला रुग्णाकडे लक्ष देण्याची सक्ती केली. तेव्हा डॉ. पाटील यांनी स्वत:चा रुग्ण सोडता येत नसल्यामुळे जवळच असलेल्या प्रसूती विभागातील डॉक्टरकडे जाण्यास सांगितले. पोलिसांनी त्याप्रमाणे त्या महिलेला प्रसूती विभागात स्वत:होऊन नेले असते तर ते खरोखर ‘हीरो’ ठरले असते. त्यांच्यातील माणुसकीही दिसली असती, असे मत वैद्यकीय शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉ. औदुंबर म्हस्के यांनी व्यक्त केले. सीसीटीव्हीत निवासी डॉक्टरला केलेल्या मारहाणीचे दृश्य सिद्ध होईपर्यंत पोलीस मारहाणीची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हते. कायदा सर्वासाठी समान आहे. मारहाणीचे कृत्य एखाद्या खासगी व्यक्तीच्या हातून घडले असते तर तिच्याविरुद्ध डॉक्टर संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झाला नसता का, असा सवालही डॉ. म्हस्के यांनी उपस्थित केला. या घटनेची चौकशी होऊन त्यात निवासी डॉक्टर प्रशांत पाटील हे खरेच दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध जरूर कारवाई व्हावी. परंतु या प्रकरणाची सत्यता न पडताळता विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी बाऊ करीत आंदोलन हाती घेतले आहे. यामागे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांच्या गैरप्रशासनाविरुद्धचा व पर्यायाने रुग्णालयातील घसरलेल्या वैद्यकीय सेवेबद्दलचा राग असू शकतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर उपचार करण्यास विलंब झाल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरविरुद्ध कारवाई होण्यासाठी राज्य महिला आयोग व मानवाधिकार आयोगाकडे दाद मागण्यात आली आहे. याबाबतची तक्रार स्वत: जैनबबी पीरजादे या पीडित महिलेने केली आहे.

Story img Loader