चिखली तालुक्यातील भोरसा-भोरसी येथे मोठय़ा प्रमाणावर अवैध देशी दारूची विक्री होते. त्यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाकडे वळत असून अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. त्यामुळे गावातील अवैध देशी दारू विक्री बंद व्हावी, याकरिता गावातील महिलांनी अमडापूर पोलिसांना निवेदन दिले आहे.
 भोरसा-भोरसी येथील महिलांनी पोलिसांकडे दिलेल्या या निवेदनावर नमूद केले आहे की, आमच्या येथे काही लोक हे गावामध्ये अवैध देशी दारू विक्री करीत असल्याने गावातील पुरुष व तरुण वर्ग व्यसनाकडे वळत आहेत. याचा त्रास गावातील महिलांना सहन करावा लागत आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. अनेक महिलांना याचा त्रास होत आहे. त्यासाठी दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करून गावातील दारूविक्री बंद करावी, अशी मागणी या महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे. पोलिसांना दिलेल्या या निवेदनावर शोभा संजय गवई, उषा पांडुरंग गवई, सुमन विठ्ठल गुजाळकर, मंगला जनार्दन हिवाळे, चांगोना किसन गुंजाळकर  यांच्यासह २१ महिलांच्या स्वाक्षरी आहेत. भोरसा-भोरसी येथील महिलांनी दिलेल्या या निवेदनावर पोलीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.    

Story img Loader