एका प्रेमी युगुलाला ठाण्यात आणून बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देत पैसे घेणाऱ्या सीताबर्डी पोलीस ठाण्यातील एक महिला पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपायाला अटक करण्यात आली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक एस.डी. वगारे व पोलीस शिपाई विष्णू खेडकर हे अटक झालेल्याचे नाव आहे.
प्रेमी युगुल व्हीएनआयटीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमसच्या सुटय़ा असल्याने हे दोघे मध्यप्रदेशातील पचमढीला फिरायला गेले होते. गुरुवारी पहाटे ते नागपुरात पोहचले. व्हीएनआयटीच्या वसतिगृहात जाण्यासाठी सीताबर्डीतून पायीच निघाले. अलंकार चित्रपटगृहाजवळ या दोघांना सीताबर्डी पोलिसांच्या गस्ती वाहनाने थांबवले. उपनिरीक्षक वगारे यांनी त्या दोघांनाही व्हॅनमध्ये बसवून ठाण्यात आले. वगारे यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. दरम्यान, आम्ही दोघेही चांगल्या परिवारातील असल्याचे सांगून व कारवाईमुळे आमचे भविष्य अंधकारमय होईल, असे सांगून त्यांनी पोलिसांना सोडून देण्याची विनंती केली. वगारे आणि खेडकरने सोडून देण्याच्या मोबदल्यात त्यांना दहा हजार रुपयाची मागणी मागितली. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी त्या दोघांची गुन्हेगारासारखी झडती घेतली. त्यांच्याकडे १३०० रुपये आढळून आले. तसेच एटीएम कार्ड आढळले. वगारे यांनी तरुणीला पैसे काढून आणण्यास सांगितले. घाबरलेल्या अवस्थेत त्या तरुणीने एटीएममधून ३ हजार रुपये काढून आणले व वगारे यांना दिले. ही रक्कम ताब्यात घेतल्यानंतर दोघांना धमकी  देऊन सोडून दिले.
या घटनेत मानसिक त्रास झाल्याने पीडित युगुलांनी गुरुवारी दुपारी पोलीस आयुक्त के.के. पाठक यांची भेट घेऊन आपबिती सांगितली. ही घटना ऐकताच पाठक यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी लगेच गुन्हे शाखेच्या पथकाला या प्रकरणाची शहानिशा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात वगारे आणि खेडकर हे दोघेही दोषी असल्याचे आढळून आल्याने अटक करण्यात आली.