बचत गटांव्दारे महिलांना स्वयंरोजगाराचे दालन खुले करून देणाऱ्या यशस्विनी अभियानाच्या माध्यमातून आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही बचत गटांनी शिरकाव केला आहे. अखिल भारतीय वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष सुनील नेरकर यांच्या पुढाकाराने ही संकल्पना साकारण्यात आली आहे.
पारंपरिक बचत गटांना प्रादेशिक तसेच भौगोलिकदृष्टय़ा मर्यादा आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बचत गट मात्र या मर्यादेपलिकडे राहणार आहे. या गटासाठी कार्यरत महिला या क्षेत्राशी संबंधित असल्या तरी कौटुंबिक जबाबदारीमुळे ज्या महिलांना घराबाहेर पडणे शक्य होत नाही, ज्यांना घरात राहून थोडय़ाफार प्रमाणात अर्थार्जन हवे आहे, अशा महिलांना स्वंयरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘इंडस्ट्रियल आरएनडी डॉटकॉम’ संस्थेने तांत्रिक भागीदार म्हणून मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविल्याने या बचत गटाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. या उपक्रमातून महिलांना मिळणाऱ्या कामाच्या मोबदल्यातून किमान एक ते दोन हजार रूपये महिन्याकाठी बचत होऊ शकतील असे नियोजन करण्यात आले आहे. प्राथमिक अवस्थेत असलेल्या या प्रयोगाची शासन स्तरावर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. पारंपरिक उत्पादने घेणाऱ्या बचत गटांना त्यामुळे पर्याय आणि प्रोत्साहन मिळू शकेल. केवळ शासकीय मदत किंवा कामांवर अवलंबून न राहता खासगी क्षेत्रातून कामे मिळविण्याचा प्रयत्न केला असल्याचे नेरकर यांनी नमूद केले आहे. संगणक, इंटरनेट सुविधा आणि टायपिंगचा किमान ३० ते ४० शब्द प्रतिमिनीट वेग असणाऱ्या व घरबसल्या काम करू इच्छिणाऱ्या महिलांना या बचत गटाच्या माध्यमातून सुमारे सहा हजार रूपये मिळू शकतील असे काम देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. इच्छूक महिलांनी http://www.industrialrnd.com या संकेतस्थळावर तळाला ‘सेल्फ एम्प्लॉयमेंट’ वर कळ दाबून नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ८३७८९४१९८१ या क्रमांकावर संपर्क साधावा. बचत गटातील सदस्यांमध्ये नाशिक येथील वैशाली देव, स्वाती कोठावदे तसेच जळगावच्या माधुरी कोतकर यांचा समावेश असल्याची माहिती नेरकर यांनी दिली आहे.

Story img Loader