महिला सुरक्षेकरिता केवळ कडक कायदे करून चालणार नाही, तर नागरिकांच्या संवेदनशून्य होत चाललेल्या मनात जाणीव जागृती व्हावी, या हेतूने येथील शास्त्रीनगर हुतात्मा स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या नागरिक व विद्यार्थ्यांच्या महिला सुरक्षा व जाणीव जागृती मोच्र्यात मोठय़ा प्रमाणात महिला, विद्यार्थी व नागरिक सामील झाले. हा शांतीमोर्चा दिल्ली येथील महिलेवरील अमानुष बलात्कारासंदर्भात होता.
मोच्र्यात पतंजली योग समिती, पतंजली महिला योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, भंडारा जिल्हा एनएसयुआय, लॉयन्स क्लब भंडारा सेंट्रल, इंडियन मेडिकल असोसिएशन, डॉ.आंबेडकर विचारमंच भंडारा, ज.मु.पटेल महाविद्यालय, तसेच ब.ला. लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठय़ा संख्येत भाग घेतला. मोर्चा निघण्यापूर्वी हुतात्मा स्मारकाजवळ झालेल्या सभेत कडक कायदा व त्याची अंमलबजावणी, संवेदनशून्य समाजात परिवर्तनाची आवश्यकता, युवक-युवतींनी स्वत:त करायचे बदल, स्वसंरक्षणाकरिता महिलांची तयारी, इ.विषयांवर डॉ.नीतीन तुरस्कर, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष मधुश्री गायधने, अभिजीत तुमसरे, मोर्चाच्या एक प्रमुख संयोजक प्रा.प्रतिमा थोटे, नीतीन बागडे, प्रभा ढोके, मोना बैस, मेघा भागवत, लॉ.मोहन नायर, लॉ.अरुण निर्वाण, माधुरी हटवार, सावरगावकर, रामदास शहारे, अर्चना जिभकाटे, राजकुमार लाडसे, कॉ.हिवराज उके, मेघा राऊत, नलू बडवाईक, मोनिका गिर्हेपुंजे, श्वेता बांगडकर, राकेश कारेमोरे, डॉ.सिंग, श्यामसुंदर शेंडे, ज्ञानेश्वर बोडखे यांनी विचार व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ संपूर्ण जगाला आंदोलनासाठी प्रेरित करणाऱ्या पीडित तरुणीला श्रद्धांजली अर्पण करतांना भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष रामबिलास सारडा, डॉ. सिंग, संध्या बांते, ब.ला. नूतन महाराष्ट्र विद्यालयाचा एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी, एनएसयुआय जिल्हा अध्यक्ष मधुश्री गायधने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रतिमा थोटे यांनी एक कविता सादर केली. संचालन गांधी विचार मंचाचे प्रा.वामन तुरिले यांनी केले. यानंतर उपजिल्हाधिकारी जाधव यांना राष्ट्रपतींच्या नावे लिहिलेले निवेदन सादर करण्यात आले.