कॉटन मार्केटमधील महात्मा फुले भाजी बाजार परिसरातील महिला मजुरांनी मंगळवारी गणेशपेठ पोलीस ठाण्यात एकत्र येऊन विनयभंग आणि अश्लील कृत्ये करण्यास चटावलेल्या गुंडांविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. या रणरागिणींच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कॉटन मार्केटमधील महात्मा फुले भाजीबाजार मध्य भारतातील मोठय़ा भाजी बाजारांपैकी एक ओळखला जातो. मध्य भारतात विविध ठिकाणी येथून भाजी पुरविली जाते. नागपूर शहराचा घाऊक व किरकोळ बाजारही येथे भरतो.
येथे भाजीच्या टोपल्या वाहून नेणाऱ्या महिला मजुरांची संख्याही मोठी आहे. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास चार-पाच गुंड बाजारात आले. त्यांनी भाजीच्या टोपल्या उचलण्यास सांगत आत झोपडीत बोलावले. तेथे त्यांनी दोन महिला मजुरांचा विनयभंग केला.
त्या गुंडांचे कृत्य पाहता वेळीच सावध होत या महिला मजुरांनी आरडाओरड केल्याने लोक धावले. लोक धावत येताना पाहून हे गुंड तेथून पळाले. आजच्या घटनेने महिला मजूर संतापल्या.
बाजारातील गुंडांविरुद्ध त्यांनी एल्गार पुकारला. महिला भाजी विकणाऱ्या महिला त्यांच्या मदतीला आल्या. ‘एकीचे बळ’ दाखवित या महिलांनी गणेशपेठ पोलीस ठाणे गाठले. गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर एवढय़ा मोठय़ा संख्यने महिला एकत्र आल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही ठाण्यात पोहोचले. काही महिलांना आत बोलावून त्यांनी चर्चा केली.
या महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आपबिती सांगितली. रोजच गजबजलेल्या या बाजारात या महिलांना नेहमीच गुंड आणि कामांधांचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी एका झोपडीत एका महिला मजुराला विवस्त्र केल्याची बाब एका महिलेने पोलिसांना सांगितली. आज सकाळची घटनाही या महिलांनी सांगितली.  गुंड अश्लील कृत्ये करण्यास चटावलेले असून त्यांना आळा घालावा, अशी मागणी या संतप्त महिलांनी केली.
या महिला मजुरांकडून तक्रार आल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आरोपी शहारुखखान सलीमखान, अकबरअली शेख, पंकज रवी गोंडाणे तसेच त्यांचा एक साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.