नागपूर विद्यापीठात महिलांची छळणूक झाल्याच्या तीन वर्षांत सहा तक्रारी मिळूनही महिला सेलने त्यापैकी एकाही तक्रारीची दखल घेतलेली नाही. महिलांची छळणूक झाल्याच्या तक्रारी विद्यापीठात दडपून टाकल्या जात असल्याची चर्चा असतानाच विद्यापीठाच्या महिला सेलकडे या प्रकारच्या नव्या तक्रारी थेट येतच असतात. तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या सेलला आतापर्यंत अशा सहा तक्रारी मिळाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात सावनेरच्या हरिभाऊ आदमने कला-वाणिज्य महाविद्यालयातील शिक्षिकेने प्राचार्याविरुद्ध केलेल्या जुन्या तक्रारीचा समावेश आहे. इतर पाच नव्या तक्रारींमध्ये विद्यापीठाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची, तसेच वर्धेच्या एका महाविद्यालयातील वरिष्ठ अधिव्याख्यातीने तिच्या प्राचार्याविरुद्ध केलेली तक्रार आहे. विशाखा प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अशा तक्रारी महिला सेलकडे पाठवल्या जायला हव्यात, परंतु विद्यमान कुलगुरूंच्या नेतृत्वाखालील विद्यापीठ प्रशासन त्या दडपून टाकण्याचाच प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पीएच.डी.च्या दोन विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्रमुख श्याम भोगा यांच्याविरुद्ध केलेली तक्रार आणि विद्यापीठाच्या अकॅडेमिक स्टाफ कॉलेजच्या वरिष्ठ अधिव्याख्यातीने माजी संचालकांविरुद्ध केलेली तक्रार ही याची दोन उदाहरणे आहेत.
ही दोन्ही प्रकरणे महिला सेलकडून सुनावणी होण्यायोग्य होती. परंतु श्याम भोगा हे सध्या विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवून असलेल्या यंग टीचर्स असोसिएशनशी संबंधित असल्यामुळे तसे होऊ शकले नाही. त्याऐवजी या आरोपांची चौकशी करण्यासाठी कुलपतींच्या नामित सदस्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीनेही भोगा यांना संबंधित विद्यार्थिनींचा मानसिक छळ आणि शिवराळ भाषेचा वापर यासाठी दोषी ठरवले. अॅकॅडेमिक स्टाफ कॉलेजच्या प्रकरणात संबंधित महिलेने कुलगुरूंकडे एक वर्षांपूर्वी लेखी तक्रार केली होती, परंतु त्याबाबतीत काहीच झाले नाही.
महिला सेलला सहा तक्रारी मिळाल्या असून त्यांच्या सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे, याला सेलच्या सदस्य सचिव नीलिमा देशमुख यांनी दुजोरा दिला. हा सेल पूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी निष्क्रिय होता, मात्र दोन वर्षांपूर्वी तो विद्यापीठाच्या महिला अध्ययन आणि विकास केंद्राशी जोडण्यात आल्यानंतर तो प्रत्यक्षात कार्यरत झाला, असे सूत्रांनी सांगितले. श्रीमती देशमुख या केंद्राच्या संचालकही आहेत. आम्ही हरिभाऊ आदमने महाविद्यालयातील प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली असून तिचा अहवाल तयार होत आहे. हा अहवाल कुलगुरूंना सादर केला जाणार असून तेच याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे नीलिमा देशमुख यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांची आणि समितीच्या सदस्यांच्या कमतरतेमुळे या कामावर परिणाम होत आहे. समिती नऊ सदस्यांची असली, तरी त्यावरील नागपूरच्या पोलीस आयुक्तांसह दोन जागा रिकाम्या आहेत. शिवाय काही सदस्य नागपूरबाहेरचे असून त्यांना दरवेळी सुनावणीसाठी येणे शक्य होत नाही, असेही त्या म्हणाल्या. असे असले तरी तक्रारी खऱ्या असल्यास पीडित महिलांना न्याय नक्कीच दिला जाईल, अशी हमी त्यांनी दिली.
नागपूर विद्यापीठातील महिला सेल निष्क्रिय
नागपूर विद्यापीठात महिलांची छळणूक झाल्याच्या तीन वर्षांत सहा तक्रारी मिळूनही महिला सेलने त्यापैकी एकाही तक्रारीची दखल घेतलेली नाही. महिलांची छळणूक झाल्याच्या तक्रारी विद्यापीठात दडपून टाकल्या जात असल्याची चर्चा असतानाच विद्यापीठाच्या महिला सेलकडे या प्रकारच्या नव्या तक्रारी थेट येतच असतात.
First published on: 06-02-2013 at 02:42 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens cell inactive in nagpur university