जिल्हास्तरावर महिलांसाठी स्वतंत्र लोकशाहीदिन तिसऱ्या सोमवारी घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला, तरी प्रशासनाला प्रत्यक्षात याचा विसर पडल्याचे आढळून आले.
महिलांवरील अन्याय, छेडछाड, छळ आदी समस्या सोडवण्यासाठी महिला लोकशाहीदिन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या घोषणेची अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक तयारी प्रशासनाने केलीच नव्हती. महिलांसाठी स्वतंत्र लोकशाहीदिन आयोजित केला जातो, याची महिलांनाही कल्पना नाही. त्यामुळे तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकाही महिलेची तक्रार आली नाही.
गेल्या आठवडय़ात उदगीर शहरात ताणतणाव असल्यामुळे प्रशासनाला महिलादिनासंबंधी तयारी करण्यास वेळ मिळाला नसल्याचे कारण सांगितले जाते. तसेच लोकशाहीदिन कोणत्या स्तरावर घ्यायचा आहे, याची दिशा स्पष्ट नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. किमान पुढच्या महिन्यात तरी या बाबतीत प्रशासनाकडून तयारी व्हावी, अशी अपेक्षा महिला संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.