नवजात शिशूची काळजी, किशोरावस्था आणि विकास, आहार व पोषण आदी विषयांवर पेठ महाविद्यालयात महिला सबलीकरण व किशोरवयीन मुलांचे शिक्षण या विषयावर आयोजित दोन दिवसीय कृती सत्रात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डांग सेवा मंडळ संचालित दादासाहेब बिडकर महाविद्यालय, पुणे विद्यापीठ प्रौढ, निरंतर व ज्ञानविस्तार विभागांतर्गत आयोजिलेल्या व्याख्यानमालेचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. विजय बिडकर आणि अध्यक्षा हेमलता बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी महिला सबलीकरण विषयावर विना कुलकर्णी, वंदना पाटील यांनी मार्गदर्शन केले. स्त्रियांच्या अंगी असलेले जीवनकौशल्य, आरोग्य स्वच्छता, दैनंदिन व्यवहार ज्ञान, अंतर्गत बँक व टपाल व्यवसाय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, महिला आर्थिक विकास महामंडळ, स्वयंसहाय्यता बचत गट, रोजगार हमी योजना, स्त्रिया व किशोरवयीन मुलींचे बळकटीकरण आदी मुद्दय़ांवर त्यांनी माहिती दिली. किशोरवयीन मुलांचे शिक्षण या विषयावर ज्योती देशमुख व वंदना सोनवणे यांनी किशोरावस्था व विकास, स्वच्छता, प्रजनन, आरोग्य, प्रजनन अवयवांना होणारा संसर्ग, आहार व पोषण, कुटुंब नियोजन, नवजात शिशूची काळजी, मासिक पाळी, लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजाराची लक्षणे, वयानुसार लिंगात होणारे बदल यांबद्दल मार्गदर्शन केले. दोन दिवसीय कृती सत्रात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच पेठ गावातील नागरिक, प्राध्यापक आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विद्यापीठ प्रतिनिधी सुनिता भोये हिने सूत्रसंचालन केले. प्रियंका मोरे, तारा मौळे, माधुरी भोये, राजेंद्र गायकवाड, प्रशांत गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. हर्षदा गायकवाड हिने आभार मानले.

Story img Loader