शहरातील गोखले शिक्षण संस्थेच्या एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत गिरणारे येथे आयोजित शिबिरात ‘महिला सबलीकरण’ विषयावर निमंत्रितांचे काव्य संमेलन झाले.
महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारावर भाष्य करणारे कवी प्रा. गंगाधर अहिरे यांच्यासह रवींद्र मालुंजकर, प्रा. छाया लोखंडे, प्रा. सुषमा अहिरराव आणि विद्यार्थिनींच्या आशयसंपन्न कवितांनी संमेलनात रंगत आणली.
दगडाला देव मानणाऱ्या संस्कृतीतच हे घडतंय
माणसातलं माणूसपणच हरवतंय
या कवितेतून हरवत चाललेल्या माणुसकीवर प्रा. छाया लोखंडे यांनी कोरडे ओढले; तर मुलींना सबल बनण्याचा संदेश देताना प्रा. सुषमा अहिरराव यांनी-
घाबरू नकोस मुली आता
वेळ-काळ ओळखायला शिक
मुली, तू आता नव्याने जगायला शिक
या कवितेद्वारे धीर दिला. शिबिरार्थी विद्यार्थिनी अंकिता मोतलिंग हिने-
बेटा गीत है तो बेटी संगीत है
बेटा प्रेम है तो बेटी पूजा है
असे सांगत मुलीचे महत्त्व पटवून दिले. कोमल ठाकूर, भावना गिरी, दक्षा सोनार, ऋचिता पंचभाई, तेजश्री खैरनार, आदिती पगार, रोशनी आहेर, ज्योती पवार यांनीही एकापेक्षा एक सरस कविता सादर केल्या. रवींद्र मालुंजकर यांनी कवितांद्वारे मनोरंजनातून प्रबोधनही केले. प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेखा जोगी यांनी स्वागत केले. प्रा. अर्चना साळुंके यांनी आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens empowerment message from the meeting poetry