उपराजधानीत चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली असून तीन महिलांचे सोन्याचे दागिने ओरबाडून नेण्यात चेन स्नेचर्स यशस्वी झाले. अंबाझरी, धंतोली आणि कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत या घटना घडल्या. दागिण्यांची किंमत १ लाख ५२ हजार सांगितली जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाडी मार्गावरील रेवती कॉम्प्लेक्समधील निवासी साधना गणेशप्रसाद श्रीवास्तव(५२) रात्री ८.३० वाजता मुलीसोबत कायनेटिक वाहन क्रमांक एमएच-३१-बीजी २२८३ ने जात होत्या. भरतनगरजवळ एलआयटी चौकजवळ दोन अज्ञात तरुणांनी साधना यांच्या गालावर थप्पड मारून सोन्याची चेन खेचली. चेनची किंमत ४० हजार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. अंबाझरी पोलीस ठाण्यात साधना यांनी तक्रार केली असून अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना धंतोली ठाण्यांतर्गत घडली. लक्ष्मीनगरात राहणाऱ्या मीना नितीन पाटील(४०) रात्री नऊ वाजता पतीबरोबर वेस्पा वाहन क्रमांक एमएच ४९ के-७०९०ने जात होत्या. धंतोलीतील श्युअरटेक रुग्णालय ते पत्रकार भवनापर्यंत जाणाऱ्या मार्गावर चिल्ड्रन केअर रुग्णालयाच्या समोर काळ्या रंगाच्या हिरो होंडाने आलेल्या दोन अज्ञात आरोपी मीना यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून फरार झाले. त्यांनी त्यांच्या चेनची किंमत ६० हजार सांगितली आहे. पाटील दाम्प्त्य धंतोली पोलीस ठाण्यात आले व त्यांनी तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तिसऱ्या घटनेत कोतवाली परिसरातील मंजुषा राम मानमोडे (३८) रात्री १०.३०वाजता त्यांच्या जाऊ प्रमिला श्याम मानमोडे यांच्याबरोबर रात्रीचे जेवण करून शतपावली करण्यासाठी बाहेर पडल्या. शिवनगर, नेहरूपार्कच्या समोर काळ्या रंगाच्या सीबीझेड एक्ट्रिन मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी मंजुषा यांचे मंगळसूत्र ओरबाडले आणि पळून गेले. त्यांनी मंगळसूत्राची किंमत ५२ हजार सांगितली. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत तक्रार केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उपराजधानीत महिला असुरक्षित; साखळीचोरांच्या टोळ्या सक्रिय
उपराजधानीत चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली असून तीन महिलांचे सोन्याचे दागिने ओरबाडून नेण्यात चेन स्नेचर्स यशस्वी झाले.
First published on: 31-08-2013 at 01:41 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens insecure in nagpur chain snatcher remain active