जिल्ह्य़ात मागील जनगणनेनुसमोर आलेले स्त्री-पुरुषांच्या विषम लोकसंख्येचे प्रतिबिंब मतदारयादीतही उमटले आहे. मागील अडीच वर्षांत जिल्ह्य़ात स्त्री मतदारांची टक्केवारी घटल्याचे दिसून येत आहे. १ जानेवारी २०१४ व १ नोव्हेंबर २०११ या अर्हता दिनांकांवर जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीतील स्त्री-पुरुष संख्येकडे लक्ष दिल्यास ही बाब स्पष्ट होते.
१ नोव्हेंबर २०११ रोजी जिल्ह्य़ात एकूण मतदारांमध्ये स्त्री मतदारांचे प्रमाण ४७.७३ टक्के होते. १ जानेवारी २०१४च्या मतदारयादीत हेच प्रमाण ४६.६७ टक्के आहे. १ नोव्हेंबर २०११ रोजी जिल्ह्य़ाच्या मतदारांमध्ये ५२.२६ टक्के पुरुष होते. परंतु १ जानेवारी २०१४ रोजी हे प्रमाण वाढून ५३.१३ टक्के झाले. चालू वर्षी जिल्ह्य़ातील एकूण १३ लाख २४ हजार ७१६ मतदारांमध्ये स्त्रियांची संख्या ६ लाख २० हजार ८३७ आहे. पुरुषांच्या तुलनेत ही संख्या ८३ हजार ४२ कमी आहे.
ताज्या आकडेवारीनुसार पुरुषांच्या तुलनेत तालुकानिहाय कमी असलेल्या स्त्री मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे : परतूर १५ हजार २७२, घनसावंगी १२ हजार ७७५, जालना १९ हजार ९९९, बदनापूर १७ हजार १७७ व भोकरदन १७ हजार ८१९. स्त्री मतदारांचे सर्वात कमी (४६.३८ टक्के) प्रमाण जालना तालुक्यात आहे. काही अपवाद वगळल्यास जालना तालुक्याचा बहुतेक भाग शहरी आहे. अन्य तालुक्यांतील स्त्री मतदारांचे प्रमाण पुढीलप्रमाणे : परतूर ४७ टक्के, घनसावंगी ४७.६७, बदनापूर ४६.७९ व भोकरदन ४६.५० टक्के.
सन २०११च्या जनगणनेनुसार जिल्ह्य़ात १ हजार पुरुष लोकसंख्येमागे स्त्रियांचे प्रमाण ९२९ समोर आले. १ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीनुसारहेच प्रमाण ८८२ आहे.

Story img Loader