मानखुर्द येथील महिलांच्या शासकीय सुधारगृहातून सहा महिलांचे झालेले पलायन संगनमताने झाल्याचा निष्कर्ष महिला बाल विकास खात्याने नेमलेल्या चौकशी समितीने केला आहे. बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री या महिलांनी बाथरुमचे गज कापून पलायन केले होते. या अहवालानंतर सुधारगृहाच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
 गेल्या दीड वर्षांत या सुधारगृहातून महिलांचे पलायन होण्याची ही चौथी घटना आहे. २६ फेब्रुवारीच्या घटनेची दखल घेत महिला आणि बालविकास खात्याने तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने दोन दिवसांत आपला अहवाल महिला आणि बालविकास खात्याच्या प्रधान सचिवांना सादर केला. ज्या दिवशी या महिलांनी पलायन केले तेव्हा सुधारगृहातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, असे या अहवालात म्हटले आहे. या सुधारगृहातील एक सुरक्षा रक्षक कसलीही पूर्वसूचना न देता रजेवर होता. तर दुसरा सुरक्षा रक्षक वेळेच्या आधी निघून गेला होता. त्यामुळे या पलायनामागे सुधारगृहातील कुणाची फूस असावी आणि संगनमनताने त्या पळून गेल्या असाव्यात, अशी शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
या सुधारगृहात सुतारकाम सुरू होते. त्या वेळी हेक्सॉ ब्लेड काढून घेण्यात आले असावे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाला महिला बाल विकास खात्याचे प्रधान सचिव, मंत्री आणि आयुक्तांना सादर करण्यात आला. २०१२ सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या काळात तीन वेळा या सुधारगृहातील महिला पळून गेल्या होत्या. कुंटणखाना आणि बारमधून सुटका करण्यात आलेल्या महिलांचे पुनवर्सन करण्यासाठी या सुधारगृहात आणून ठेवण्यात येते. येथील निकृष्ट सेवेमुळे आणि होणाऱ्या त्रासामुळे महिला येथून पळून जात असल्याचे निदर्शनास आले होते. महिलांचे समुपदेशन सर्वासमक्ष केले जात असल्यानेही त्या नाराज असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या दीड वर्षांत येथील महिला पळून जाण्याच्या चार घटना घडल्याने वरिष्ठ अधिकारी संतप्त झाले आहे. सुरक्षा नियमांच योग्य पालन होत नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. सुधारगृहाच्या अधीक्षकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. चेंबूर येथे महिलांचे नवीन शासकीय सुधारगृह तयार झाले असून अद्याप तेथे या महिलांना स्थलांतरीत करण्यात आलेले नाही.