‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल
आजचा दिवस एकदम मस्त झाला. आज चक्क तिने सकाळी बसमध्ये स्माईल दिले. ‘व्हॉटस अ‍ॅप’चा परिणाम असावा, असं मला वाटतंय. पण अजून माहीत नाही. यामुळे आजचा दिवस चांगला जाणार हे निश्चितच होतं. त्यामुळे माझा उत्साह द्विगुणीत झाला आणि मी माझ्या कॉलेजमध्ये पळतपळत रिहर्सल रूममध्ये गेलो. शेवटचा सराव होणार होता. गाण्याच्या सुरांसोबत मला पेटीचा सूर धरायचा होता. म्हणजे खरोखरच धरायचा होता. पेटी वाजवायची नव्हती. ‘काळी ४’मधील ‘सा’ आणि ‘वरचा सा’ दोन्ही बटणं गाणे संपेपर्यंत धरून ठेवायची होती. त्यासाठी मी गेली १५ दिवस सराव करत होतो. आंतर महाविद्यालयील स्पर्धा असल्यामुळे चुकीची पट्टी लागायला नको म्हणून ही विशेष काळजी. तिच्या महाविद्यालयात आमचा लवाजामा शिरला. मी स्टाईलमध्ये हातात पेटी घेऊन प्रवेश केला. सुदैवाने ती समोरच कँटिनजवळ उभी होती. बस्स. तिनं माझ्या हाततली पेटी पाहावी आणि मी पेटी वाजावतो, हे तिला कळावं यासाठी माझी धडपड सुरू झाली. एकदा जड जड करत पेटी खाली ठेवली आणि परत उचलली. पण काही फरक नाही पडला. जाताना तिच्या जवळून गेलो मुद्दाम. तरीही काही नाही. अखेर मी जिन्याजवळ गेलो तेव्हा माझ्या हातातील पेटी पाहून ‘तू माझ्या कॉलेजात कसा?’ असा प्रश्न ती विचारेल, अशी भाबडी आशा मला होती. पण नाही. हे खरं जीवन आहे, चित्रपट नव्हे. कार्यक्रम सुरू झाले. ती पहिल्या रांगेतच बसली होती. आमचा कार्यक्रम झाला. आणि आम्ही स्पर्धा जिंकलीही. पण त्याहीपेक्षा ती चक्क माझ्याशी बोलली. मला म्हणाली ‘पेटी छान वाजवतोस’. इतकं बोलून हसत हसत निघून गेली. माझ्या बरोबरीच्यांच्या भुवया उंचावल्या. पण त्यांच म्हणणं आहे की तिनं मला चिडवलं. तसे असलं तरी चालेल. ती माझ्याशी बोलली हेच खूप झालं. आता पुढे काय? ‘व्हॉटस अ‍ॅप’ला उत्तर अजून नाही आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाथा कामत

नाथा कामत