सध्याच्या सर्वागीण वातावरणाचा विचार करता, पत्रकारितेचे खरे अंग दाखवून देण्याची संधी आणि वेळ चालून आली आहे. त्यासाठी पत्रकारांना ज्ञान साधनेची गरज असून, नवा विचार, आचार अन् बौध्दिक शक्तीशीही जवळीक साधावी लागणार आहे. तरी,कराडसारख्या तालुक्याच्या ठिकाणीही पत्रकारांच्या अभ्यासिकेची गरज आहे. याकामी आर्थिक मदतीसह सर्वतोपरी सहकार्याची भूमिका आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी बोलून दाखवली.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील यशवंत हायस्कूलमध्ये पत्रकार दिनानिमित्त शहर परिसरातील पत्रकारांचा सत्कार उंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. तर, रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे विश्वस्त अॅड. रवींद्र पवार हे अध्यक्षस्थानी होते.
उंडाळकर म्हणाले, की शस्त्रापेक्षा शब्द धारदार असतात, हे प्रत्येक परिवर्तनात पत्रकारितेने दाखवून दिले आहे. तरी, स्वातंत्र्यासाठीच्या परिवर्तनाची परिस्थिती पत्रकारांनी तपासणे, अभ्यासणे गरजेचे आहे. प्र. के.अत्रे यांनी त्याकाळी  समाजहितार्थ राज्यकर्ते व शासनकर्त्यांंवर आपल्या पत्रकारितेच्या ताकदीचा अंकुश ठेवला होता. त्यांची भूमिका मला चांगलीच भावली. पत्रकारांनी राष्ट्रीय वृत्तपत्रे वाचण्याची, तसेच केवळ बातम्या वाचून सर्वकाही समजत नसल्याने आवर्जून संपादकीय वाचण्याची नितांत गरज असून, ‘लोकसत्ता’ च्या गिरीश कुबेर यांचे अग्रलेख सध्या अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा काळ, प्रश्न, सामाजिक स्थिती वेगळी होती. सध्या धावते जग असून, देश-विदेश, अवघ्या विश्वाची महती अन् माहिती, चौफेर जगाची जिज्ञासा, राष्ट्राचा,  संपूर्ण जगाचा विचार पत्रकारांना असायला हवा, असे मत व्यक्त करताना, पत्रकार लोकांना किती विचारधन देतात हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उंडाळकर म्हणाले.  पत्रकारितेला नैतिक बांधिलकी असते. त्याची प्रतिष्ठा राखली जावी अशी एकूणच समाजाची अपेक्षा असल्याचे नमूद करून जुन्या पिढीतील नेते व संपादकांची स्वतंत्र बांधिलकी होती. वैचारिक संघर्षही होता. असे वैचारिक बैठक असलेले नेते, संपादक व पत्रकार आपल्या विचारांशी कोणतीही तडजोड करीत नव्हते. तरी, आजच्या पत्रकारांनी स्वत:च्या बांधिलकीचे, भविष्याचे, समाजहिताचे भान ठेवून कार्यरत राहणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. रवींद्र पवार म्हणाले, की समाज म्हणजेच आम्ही, पत्रकारांच्या कायम ऋणात असून, ते व्यक्त करण्यासाठीच आजचा सत्कार समारंभ आहे. आज समाजात पत्रकारांचा दर्जा एका उंचीवर असून, हा दर्जा आणखी उंचावण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्रकार समाजाचा आरसा, समाजाची नाडी
ओळखून नित्याने काम करतो म्हणून, पत्रकार दररोज सन्मानपात्र असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी पत्रकारितेला मोठा इतिहास असून, जिज्ञासा, निरीक्षण आणि चिंतन या तीन बाबी पत्रकारितेसाठी मोलाच्या असल्याचे मत त्यांनी मांडले.

Story img Loader