यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते. त्यांची उच्च विचारसरणी, अत्यंत साधेपणाने वागण्याचे संस्कार आजही सर्वासाठी आदर्श आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या या लोकनेत्याच्या नावाने चालणारे विद्यापीठ आपल्याच मातृभाषेतून शिक्षण देऊन वंचित घटकांपर्यंत पोहचत आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन सहकार महर्षि बाळासाहेब वाघ यांनी केले. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांच्या सांगता समारंभानिमित्त विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
समतोल राजकारणी, कुशल मुत्सद्दी, व्यवहारचतुर, कुशल प्रशासक, साहित्यिक, कुटुंबवत्सल अशा विविध पैलूंनी समृद्ध असे व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाणांचे होते. या व्यक्तिमत्त्वाचा उपयोग त्यांनी नेहमीच समाजासाठी केला. राग, लोभ बाजूला ठेवून महाराष्ट्राबरोबरच देशाच्या जडणघडणीत आपले आयुष्य वेचले. विकसित देशांनी त्यांच्या मातृभाषेचा पुरस्कार करून शिक्षणात होणारी गळती थांबवली म्हणूनच त्यांनी प्रगती साधली. या पद्धतीनेच आपण आपल्या मातृभाषेची कास धरून ज्ञानाचे रूपांतरण निर्मितीत केल्यास यशवंतराव चव्हाणांची जन्मशताब्दी खऱ्या अर्थाने साजरी केल्यासारखे होईल, असा विश्वासही वाघ यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी केले. जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठाने ११ विभागीय केंद्रात निबंध, वक्तृत्व स्पर्धा, पुस्तक प्रकाशन, विचारवंतांची व्याख्याने असे विविध उपक्रम आयोजित केले होते. त्याचा आढावा जन्मशताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील यांनी घेतला. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रवीण घोडेस्वार यांनी आभार मानले.
विभागीय आयुक्त कार्यालय
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांच्या सांगता कार्यक्रमात आयुक्त रवींद्र जाधव यांनी देशातील अनेक राजकारणी यशवंतरावांनी घडविले असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी विलास पाटील, अॅड. मयूर जाधव, अपर जिल्हाधिकारी आर. व्ही. गमे, अपर जिल्हाधिकारी रक्ताटे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील उपस्थित होते. अॅड. जाधव यांनी यशवंतरावांच्या अभ्यासू नेतृत्वाचा फायदा देशाला युद्धाप्रसंगी झाल्याचे सांगितले. त्यांनी मार्गदर्शनातून यशवंतरावांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी राजकारणाला सुसंस्कृत वळण लावण्याचे काम करणारा नेता या शब्दांत यशवंतरावांविषयी गौरवोद्गार काढले. सूत्रसंचालन नायब तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा