माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी परदेशात शिक्षण घेऊनही त्यांनी येथील मातीशी नाते तोडले नाही, ते समाजातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी सतत झटत आहेत. त्यांच्याप्रमाणेच कार्यसंस्कृती प्रत्येकामध्ये रूजली पाहिजे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव इस्माइल मोहम्मद मुल्ला यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारा ‘आदर्श रयत सेवक पुरस्कार’ माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना आज सातारा येथे प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शिंदे बोलत होते. संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. एन. डी पाटील, उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सरोज पाटील, सिंधूताई कोल्हे आदी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शंकरराव कोल्हे यांनी सांगितले की, परदेशातील लोक सतत काहीना काही काम करीत असतात; भले त्यांच्यात दोष असतील, पण त्यांच्यातील चांगले आपण घेतलेच पाहिजे. आज मुले-मुली पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडतात, मात्र त्यांच्यात इंग्रजी संभाषण कौशल्याचा अभाव असल्याने ते इतरांच्या तुलनेत मागे पडतात. गुणवत्ता वाढीसाठी प्रत्येकाने मन लावून काम करावे. रयतमधील मुलामुलींना दैनंदिन शिक्षणक्रमाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाचे धडे दिले पाहिजेत. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची वाढती फौज कमी होईल व त्यांना काम मिळेल.
एन. डी. पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. सचिव डॉ. अरविंद बुरूंगले यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, विश्वस्त अमित कोल्हे, संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष विलासराव वाबळे आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. मनिषा पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. शिवलिंगमेन कुदळे यांनी सूत्रसंचालन केले, तर सहसचिव नानासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा